शाळांमध्येही लावा मोदींचा फोटो, शिक्षण विभागाकडून आदेश
By Admin | Published: January 14, 2017 11:11 AM2017-01-14T11:11:31+5:302017-01-14T11:13:31+5:30
मध्यप्रदेश सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि कार्यालयांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याचा आदेश दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
भोपाल, दि. 14 - मध्यप्रदेश सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि कार्यालयांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारने 7 जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाला यासंबंधीचा आदेश पाठवला आहे.
राज्यातील अनेक सरकारी इमारतींमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अद्यापही लागला नसल्याचं निरीक्षणात समोर आलं असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटा लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व सरकारी विभागांना हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने या आदेशाची प्रत आपल्या वेबसाईटवरही अपलोड केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्राप्त केला जाऊ शकतो असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
शालेय शिक्षण मंत्री दिपक जोशी यांनी 'नेत्यांचे फोटो लावणे आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती देणे शिक्षणाचा भाग आहे. याची आठवण करुन देण्यासाठी हा आदेश देण्यात आला', असल्याचं सांगितलं आहे. 'यामुळे कोणतंच नुकसान होत नाही' असंही ते बोलले आहेत.