शाळांनी परदेश वारी सोडून आधी मुलांना भारत दाखवावे - महेश शर्मा
By admin | Published: November 23, 2014 03:27 PM2014-11-23T15:27:40+5:302014-11-23T15:53:50+5:30
शाळांनी मुलांची सहल परदेशात नेण्याऐवजी आधी त्यांना भारत दाखवावे असे परखड मत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मांडले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - शाळांनी मुलांची सहल परदेशात नेण्याऐवजी आधी त्यांना भारत दाखवावे असे परखड मत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मांडले आहे. यासंदर्भात नियम आणण्यासाठी शर्मा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली असून हा नियम लागू झाल्यास शाळांच्या परदेश वा-यांवर लगाम लागणार आहे.
शाळांमधील परदेशी भाषांपाठोपाठ परदेश दौ-यांवरही भाजपा सरकारने आक्षेप घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शाळांच्या परदेशातील सहलींवर पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. शर्मा म्हणाले, भारतातील मुलांना दुबई, मलेशिया आणि थायलंडमध्ये जायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम भारताचा दौरा करावा असे मत शर्मा यांनी मांडले. शालेय सहली भारतातील ऐतिहासिक वास्तू, स्मृतीस्थळं येथे नेण्याचे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शर्मा यांनी स्मृती इराणी यांच्याशीही चर्चा केली आहे. परदेशामध्ये त्यांच्या पर्यटन स्थळांची नियोजनबद्ध पद्धतीने प्रसिद्धी दिली जाते व आपण यातच कमी पडतो अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुलांच्या देशांतर्गत सहली वाढल्यास त्यांना भारताचा इतिहास व संस्कृतीची माहिती होईल असे त्यांनी सांगितले.