शाळांनी गणवेशासाठी खादीचा वापर करावा; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:40 PM2021-09-01T12:40:47+5:302021-09-01T12:45:01+5:30
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची सूचना : ‘खादी इंडिया क्विझ स्पर्धेचे उद्घाटन
नवी दिल्ली : खादीचा देशभर व्यापक प्रमाणात उपयोग केला जावा आणि शैक्षणिक संस्थांनी गणवेशासाठी खादीचा वापर करता येईल का याचा विचार करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी केले.
जनतेने खादीला राष्ट्रीय वस्त्र म्हणून अंगीकारावे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींनी खादीच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले. खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीजने ‘आझादी का अमृत महोत्सव’चा भाग म्हणून येथे आयोजित केलेल्या ‘खादी इंडिया क्विझ स्पर्धेच्या उद्घाटनसमारंभात नायडू बोलत होते.
पर्यावरण रक्षणासाठी खादीच्या होणाऱ्या लाभांचा संदर्भ नायडू यांनी दिला. “खादीच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा विजेची गरज नसल्यामुळे कार्बन निर्माण होत नाही. कपड्यांना दीर्घकाळ टिकणारा पर्याय म्हणून जग खादीकडे बघत आहे. खादी ही पर्यावरणस्नेही आणि टिकावू वस्त्र असल्यामुळे त्या गरजांची पूर्तता निश्चितच होते,” असेही नायडू म्हणाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यलढ्याशी जोडता येईल नाते
शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी खादीचा वापर करता येईल का याचा विचार करावा, असे सांगून नायडू म्हणाले की, तसे झाल्यास खादीच्या अनेक फायद्यांचा अनुभवच त्यांना घेता येईल, असे नाही, तर त्यांना महान स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढ्याशीही नाते जोडण्यास मदत मिळेल.