विज्ञान, गणितात आमदार झाला बी.कॉम!
By admin | Published: December 30, 2016 02:31 AM2016-12-30T02:31:49+5:302016-12-30T02:31:49+5:30
पदार्थविज्ञान आणि गणित हे विषय घेऊन आपण बी. कॉम.ची पदवी घेतली असल्याचा दावा टीव्हीवरील एका मुलाखतीत ठामपणे करून जलिल खान या सत्ताधारी
हैदराबाद : पदार्थविज्ञान आणि गणित हे विषय घेऊन आपण बी. कॉम.ची पदवी घेतली असल्याचा दावा टीव्हीवरील एका मुलाखतीत ठामपणे करून जलिल खान या सत्ताधारी तेलुगु देसमच्या आमदाराने स्वत:चे हंसे करून घेतले.
तुम्हाला वाणिज्य विषयाची आवड आहे का? अणि आपण चार्टर्ड अकाउंटन्ट व्हावे, असे तुम्हाला कधी वाटले का, असे मुलाखतीत विचारता जलिल खान म्हणाले की, पदार्थ विज्ञान आणि गणित या विषयात रस असल्यानेच मी वाणिज्य शाखेचा अभ्यास करून बी.कॉम. झालो!
मुलाखत घेणारा स्वत: वाणिज्य पदवीधर होता व पदार्थ विज्ञान अणि गणित हे विषय बी.कॉम. ला नसतात, असे सांगून खान यांना सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आमदारसाहेबांनी आपला हेका सोडला नाही. त्यांना उलट मुलाखत घेणाऱ्यासच प्रश्न केला: बी.कॉममध्ये हे विषय शिकवत नाहीत, हे तुन्हाला कोणी सांगितले? कदाचित तुम्ही विसरला असाल. अकाऊंट्स म्हणजे पदार्थविज्ञान आणि गणितच ना?
लहानपणापासून गणित हा आपल्या आवडीचा विषय आहे व त्यात अपण पैकीच्या पैकी गुण मिळवत आलो. त्यामुळे आपल्याला कधी कॅल्क्युलेटरही वापरावा लागत नाही, अशी बढाईही खान यांनी मारली. (वृत्तसंस्था)