विज्ञान भवनात शक्तिप्रदर्शन !
By admin | Published: December 4, 2015 01:03 AM2015-12-04T01:03:45+5:302015-12-04T01:03:45+5:30
दिल्लीच्या विज्ञान भवन येथे १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७५वा वाढदिवस हा एकप्रकारे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या विज्ञान भवन येथे १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७५वा वाढदिवस हा एकप्रकारे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला देशभरातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हीव्हीआयपींची यादी प्रचंड मोठी असल्याकारणाने या सर्वांना विज्ञान भवनातील व्यासपीठावर कसे सामावून घ्यायचे, हा आयोजकांपुढचा यक्षप्रश्न आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किमान डझनभर मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तथापि आयोजकांना सोनिया गांधी यांच्याकडून अद्याप होकार मिळालेला नाही. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि एच. डी. देवेगौडा हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, राज्यसभेचे नेते अरुण जेटली आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनाही निमंत्रित करण्यात आले
आहे.
सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विज्ञान भवनच्या व्यासपीठावर फक्त १३ लोकांना सामावून घेता येते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्व व्हीव्हीआयपींना एका व्यासपीठावर कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न आयोजकांसमोर आहे. प्रकाशसिंग बादल हे देशातील सर्वांत ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत आणि ते आले तर त्यांना व्यासपीठावर स्थान द्यावेच लागेल. राष्ट्रवादीचे नेते
आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जुलै २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असल्याने महत्त्वाकांक्षी पवार यांनी रायसिना हिल्सवर डोळा ठेवून हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित तर केला नाही ना, असा प्रश्न सत्तेच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
पवारांचा हा ७५ वा वाढदिवस देशभरात साजरा करण्याची योजना असून हा मोठ्या राजकीय डावपेचाचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. शिवाय विज्ञान भवनमधील हे शक्तिप्रदर्शन एक राजकीय संकेतही ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर नजर?
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जुलै २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असल्याने महत्त्वाकांक्षी पवार यांनी रायसिना हिल्सवर डोळा ठेवून हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित तर केला नाही ना, असा प्रश्न सत्तेच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.