विज्ञानपीठ हरपले...
By Admin | Published: July 28, 2015 05:27 AM2015-07-28T05:27:34+5:302015-07-28T05:27:34+5:30
धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉ. अब्दुल कलाम सोमवारी रात्री आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेले.
धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉ. अब्दुल कलाम सोमवारी रात्री आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेले. राष्ट्रपती पदापासून भारतरत्नच्या सन्मानापर्यंतची सारी लौकिक आभूषणे फिकी ठरविणाऱ्या या साध्या-सात्विक शास्त्रज्ञाने सत्य, निष्ठा आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाचा संस्कार देशातील तीन पिढ्यांवर केला. देशाला बलशाली होण्याची ज्यांनी दिशा दिली, त्या डॉ. कलाम यांनी देशाचे भविष्य असलेल्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांना शिलाँगमध्ये दिशा देत असतानाच अंतिम श्वास घेतला. त्यांच्या अकाली जाण्याचे सर्वांनाच धक्का बसला. एक विज्ञानपीठ हपरले अशा शब्दात अनेकांनी भावना व्यक्त केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.....
मार्गदर्शक महापुरुष
डॉ. कलाम हे जीवन आणि कार्यामुळे देशवासीयांना प्रेरित करणारे महापुरुष होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच माझ्याकडे शब्दच नव्हते. ते एखाद्या महापुरुषाप्रमाणे जीवन जगले. आपल्या कार्याने त्यांनी देशवासीयांना कायम प्रेरित केले. आज संपूर्ण देश त्यांना नमन करीत आहे. त्यांनी वैज्ञानिकाच्या रूपात देशाला नव्या उंचीवर नेले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती
डॉ. कलाम हे जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती होते. त्यांच्या स्वभावातील नम्रता, सदाचार यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. लहान मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी ते देशातील युवकांना कायम प्रोत्साहन देत. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला.
ते खरे देशभक्त
- सोनिया गांधी
डॉ.कलाम हे थोर शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मुत्सदी होते. लाखो युवकांना प्रेरणा देणारे खरे देशभक्त होते. उक्ती आणि कृतीतून त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले. त्यांनी आपल्या व्यवस्थेत दिलेले योगदान असमांतर असेच राहील. त्यांनी देश- विदेशातील लाखो लोकांना प्रेरित केले. आयआयएममध्ये अखेरचे भाषण देतानाही त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले. आज संपूर्ण देश त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशवासीयांसोबत उभी ठाकली आहे, असे त्या म्हणाल्या.
देशाने सच्चा व
प्रामाणिक शिक्षक गमावला - विजय दर्डा
राज्यसभेचे खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांच्यासोबतच्या आपल्या आठवणी आणि भेटींचे स्मरण करताना विजय दर्डा म्हणाले, ‘डॉ. कलाम हे विलक्षण प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या निधनामुळे भारताने एक सच्चा आणि प्रामाणिक शिक्षक गमावला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण यासारख्या क्षेत्रात आपल्या अनुभवाच्या ज्ञानगंगेने त्यांनी सदैव नवे शिक्षण दिले. खासदारांसोबत संवाद साधतानादेखील त्यांनी आम्हाला लोकशाही बळकट बनविण्यासाठी आपले अनुभव विशद केले. ते खऱ्या अर्थाने पंडित नेहरूनंतरचे दुसरे ‘चाचा’ होते. बालकांप्रति असलेल्या अपार स्नेहामुळेच त्यांनी बालकांची मने जिंकलेली होती. बालक आणि युवकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे डॉ. कलाम यांनी नव्या पिढीला योग्य नैतिक मूल्यांची शिकवण मिळावी या उद्देशाने जैनाचार्य महाप्रज्ञाजी यांच्या सहकार्याने ‘जीवन विज्ञान’ या पुस्तकाची निर्मिती केली होती. त्यांच्या निधनाबद्दल मी शोकसंवेदना व्यक्त करतो.
कलाम हे साधे,
सरळ व्यक्तिमत्त्व
डॉ.अब्दुल कलाम यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. ही मन हेलावणारी बातमी आहे. खूप साधा, सरळ व्यक्तिमत्व अशी ओळख डॉ.कलाम यांची होती. कलाम हे २४ तास कामात व्यस्त असणारे व्यक्ती होते. जर दिवसाचे २५ तास असते तर त्यांनी तेवढा वेळही काम केले असते आणि तेही त्यांना अपुरे पडले असते. विक्रम साराभाई यांनी कलाम यांना एका अभ्यासक्रमात घेतले होते आणि त्यानंतर कलाम यांनी आपली कला यात दाखवली होती. नासामध्येही कलाम यांना दोन ते तीन वेळा पाठवण्यात आले होते. नासाच्या शास्त्रज्ञांनीही कलाम यांचे काम आवडले होते. कलाम यांना आम्ही बिझी ए म्हणत होतो. त्यांचे काम आणि त्यांच्या कल्पना हे खूपच मोठ होत. एसएलव्हीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे संशोधनातील योगदान हे महत्वाचे आहे. तसेच राष्ट्रपती म्हणूनही देशाचा कारभार पाहताना त्यांनी मोठ योगदान दिले आहे. - डॉ.ई.व्ही.चिटणीस,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्त्रोतील कलमांचे सहकारी
आपले प्रेरणास्थान, भारताचा मिसाईल मॅन, द्रष्टे, माजी राष्ट्रपती माननीय एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. कलाम यांनी आपल्याला मोठी स्वप्न पाहायला शिकविले आणि ती सत्यात येऊ शकतात, यावर विश्वासही ठेवायला लावले. भारताला सुपर पावर बनविण्याच्या मार्गावर त्यांनी आपले नेतृत्व केले. मी या महान भारतीयापुढे झुकतो आणि त्यांना मानवंदना देतो.
-देवेंद्र फडणवीस
देशातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देण्याचे काम माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने तरुणांचा प्रेरणास्रोत हरपला. भारतरत्न कलाम हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात दैवत्वाचा साक्षात्कार होता. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी, वैचारिक उंची, आणि बुद्धीची चमक विलक्षण होती. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
-सी. विद्यासागर राव
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे अकाली झालेले निधन ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. व्यक्ती म्हणून कलाम अत्यंत चांगले होते. एका कार्यक्रमात त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला होता, ‘तुला काय व्हायचे आहे?’ यावर त्या मुलाने उत्तर दिले होते, ‘मला तुमच्यासारखे शास्त्रज्ञ व्हायचे आहे.’ त्यावर त्यांनी पटकन उत्तर दिले होते, ‘तुला शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर जयंतसारखा शास्त्रज्ञ हो. मी शास्त्रज्ञ नाही, टेक्नोक्रॅट आहे.’ वरुण भालेराव नावाचा एक विद्यार्थी होता. मी आणि वरुण दुर्बिणीतून पाहात असताना अब्दुल कलाम तिथे होते. तेव्हा त्याने वरुणला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते. त्याला त्यावरचा संदेश वाचण्यास सांगितला होता. वरुण एक शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. त्यांनी व्हिजन २०२० पाहिले होते. त्यांच्या जाण्याने दु:ख झाले आहे.
- अरविंद परांजपे,
संचालक, नेहरु तारांगण
मला आताच कळले की माजी राष्ट्रपती कलामांचे निधन झाले. हे ऐकून मला खूप दु:ख होत आहे. मी त्यांना जवळून ओळखत होते. ते खूप मोठे शास्त्रज्ञ होते, चांगले व्यक्ती होते आणि खूप चांगले कवीही होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
-लता मंगेशकर
डॉ. कलाम आयुष्यभर शिकत राहिले. त्यांनी अखेरचा श्वासही शिकत आणि प्रेरणा देतच घेतला. दुर्मीळ जीवनात त्यांनी दुर्मीळ पद्धतीने आणि दुर्मीळ ठिकाणी त्यांनी सेवा केली.
- किरण बेदी
कलाम हे आमचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यांच्यासारखा ज्ञानी आणि तरीही अतिशय साधा असलेला माणूस पुन्हा होणार नाही. हा धक्का पचवणे माझ्यासाठी फार कठीण आहे. लक्ष्मण यांच्या निधनानंतर ते मला भेटायला आले होते.
- कमला लक्ष्मण,
आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी
डॉ. अब्दुल कलाम म्हणजे देशाचे भवितव्य होते. शुभचिंतक होते. त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी वेचले. जमिनीवर राहून काम करणारा हा माणूस सर्वसामान्यांच्या जवळचा होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि संशोधनासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अशा या विश्व संशोधकाच्या निधनाने अपरिमित हानी झाली आहे.
- डॉ. राजेंद्र सिंह, जलपुरुष
डॉ. अब्दुल कलाम हे केवळ देशाचे शास्त्रज्ञ नव्हते तर ते विश्वाचे शास्त्रज्ञ होते. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. जगविख्यात असूनही हा माणूस जमिनीवर होता. आणि विशेषत: विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रेरणा देण्यावर त्यांनी कायम भर दिला. भारतीय सायन्स काँग्रेससारखा कार्यक्रम असो वा इतर कोणतेही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम. हा माणूस नेहमी इतरांना प्रोत्साहन देत राहिला.
- कृष्णानंद होसाळीकर,
उपसंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते
एपीजे अब्दूल कलाम यांच्या निधनाने खूप मोठा शास्त्रज्ञ हरपला आहे. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी केंद्र शासनाच्या एका योजनेसाठी काम करत असताना कलाम संगणक कार्यक्रमासाठी कोकणात आले होते. यावेळी त्यांनी तेथील लोकांशी मोकळेपणाने चर्चा केली. राष्ट्रपती असताना ते मुंबई विद्यापीठाच्या १५0 वा सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यातून ते विद्यार्थ्यांचेही मित्र असल्याचे जवळून पाहण्यास मिळाले. समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्तीचे ते नेते होते. अचाट बुद्धीमता असलेले शास्त्रज्ञ देशाचे राष्ट्रपती झाले हे लोकशाहीचे यश आहे.
- संजय देशमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु
सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठान आणि पुणेकर नागरीक यांच्या वतीने दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना २३ सप्टेंबर २०१३ रोजी पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात डॉ. कलाम यांच्या हस्ते भारतभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी प्रदर्शनातील चित्रे पाहून डॉ. कलाम खूप भारावून गेले होते. त्यातही लक्ष्मण यांनी काढलेले अग्निक्षेपणास्त्राचे चित्र कलाम यांना विशेष आवडले होते. त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे त्याचे छायाचित्र काढले होते. - कैलास भिंगारे, व्यंगचित्रकार
भारतीय सैन्याची ताकद वाढवणारी क्षेपणास्त्रे तयार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. अग्नी क्षेपणास्त्र तयार करताना वालचंदनगर येथे या क्षेपणास्त्राचे कवच तयार करण्यात येत होते. तर दिघी येथील ‘आर अॅण्ड डी’मध्ये काही पार्टस् तयार केले जात होते. मी त्यावेळी ‘आर अॅण्ड डी’मध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होतो. हैदराबादहून कलाम कायम या कामातील प्रगती पाहण्यासाठी पुण्याला येत असत. साधारणपणे १९८६-८७ च्या या आठवणी आजही मन:पटलावर ताज्या आहेत. सियाचीन येथे बांधण्यात आलेल्या थंडीरोधक घरांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. तसेच सियाचीनमध्ये कमी आॅक्सिजनमध्येही पेटणारे विशिष्ट प्रकारचे कोळसे शेगडीसाठी तयार करण्यातही त्यांचा वाटा होता.
- चंद्रकांत वाघमारे, तत्कालीन पर्यवेक्षक,आर अॅण्ड डी, दिघी)
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००३ साली मला ‘बालश्री पुरस्कार’ मिळाला होता. त्यांचा सहवासात सकारात्मक उर्जा आहे, त्यावेळी पुरस्कार सोहळ््यानंतर सर्व लहानग्यांचे त्यांनी लाड केले होते. शिवाय, त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने उपस्थित लहानग्यांच्या डोळ््यांत नवी स्वप्ने पेरली, त्यांना स्वप्नांना सत्यात उतरविण्याची ताकद डॉ.कलाम यांनी दिली. त्या सोहळ््यात मी कविता सादर केली होती, सादरीकरणानंतर त्यांनी मला बोलावून त्या कवितेचा आशय समजावून घेतला. त्यावेळी भारताचे राष्ट्रपती माझ्याशी बोलत आहेत, असे क्षणभरही वाटले नाही. या उलट, घरातील आजोबा प्रेमाने आणि हक्काने बोलत आहेत असेच वाटत होते. डॉ. कलाम यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी साधलेला संवाद क्षणात ‘फ्लॅशबॅक’ झाला, त्यांचे शब्द नव्या स्वप्नांसाठी कायम प्रेरणा देतील हे निश्चित. - स्पृहा जोशी, अभिनेत्री
कलाम यांनी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक म्हणून देशाचे नाव जगभरात उंचावले. त्यांनी युवकांना प्रेरणा आणि देशाला नवी दिशा दिली. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.
- प्रतिभा पाटील, माजी राष्ट्राध्यक्ष
कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते. एका महान आत्म्याला श्रद्धांजली.
- सुषमा स्वराज, विदेशमंत्री
ते देशाचे महान सुपुत्र होते. आम्ही सर्व शोकाकूल आहोत.
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री
देशाचा खराखुरा भारतरत्न हरपला आहे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
त्यांनी राष्ट्रपती असताना बजावलेली घटनात्मक कटिबद्धता अतुलनीय अशी होती. त्यांनी देशाचे नाव जगाच्या पटलावर पोहोचविले. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो.
- राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश
भारताचे सर्वात प्रेमळ माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. डॉ. कलाम खऱ्या अर्थाने ‘भारतरत्न’ होते; देशातील लहानग्यांची पिढी डॉ. कलाम यांना सगळ््यात जास्त ‘मिस’ करेल.
- शोभा डे, लेखिका
आपल्या देशाचे सर्वप्रथम लोकांचे असणारे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. हे केवळ आपल्या देशाचे नव्हे तर अवघ्या जगाचे मोठे नुकसान आहे.
- अजय देवगण, अभिनेता
डॉ.कलाम केवळ उत्तम माजी राष्ट्रपती नव्हते, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान होते. माझ्या आयुष्यात भेट झालेल्या सर्वात विनयशील व्यक्ती म्हणजे डॉ. कलाम. सर तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल.
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, क्रिकेटर
डॉ.कलाम यांच्या निधनाने भारतीयांचे मोठे प्रेरणास्थान असणारी व्यक्ती हरपली आहे.
- फरहान अख्तर, दिग्दर्शक
माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांची निधनवार्ता ऐकून दु:ख झाले. डॉ.कलाम नेहमी आमच्या ह्रदयात राहतील.
- शाहरुख खान, अभिनेता
सगळ््यात उत्तम माजी राष्ट्रपती असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने उदासीनता पसरली आहे. आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे.- रेणुका शहाणे, अभिनेत्री
आजचा क्षण भारतीयांसाठी खूप दु:खद आहे. डॉ. कलाम यांच्या जाण्याने प्रेरणेचा स्त्रोत गमावला आहे.
- शंकर महादेवन, गायक
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आजच्या तरुणपिढीचे प्रेरणास्थान गमावले आहे.
- रविना टंडन, अभिनेत्री
आज देशाचा खराखुरा ‘हिरो’ आपण गमावला आहे. तुम्ही आमच्यात नसला तरी, प्रत्येक प्रेरणेमागे कायम तुम्हीच असाल!
- चेतन भगत, लेखक
आपल्या देशाचा ‘अग्निपंख’ हरपला. डॉ. कलाम यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना.
- विनोद तावडे,
सांस्कृतिक कार्य मंत्री
डॉ. कलाम तुम्ही जेव्हा
राष्ट्रपती झालात, तेव्हा ‘आशा’ या शब्दाला नवा अर्थ प्राप्त करुन दिला. डॉ. एपीजे
अब्दुल कलाम यांच्या जाण्याने देशाच्या तरुणपिढीला कायम प्रोत्साहन देणारा वैज्ञानिक गमावला आहे.
- ए.आर.रेहमान, संगीतकार
डॉ.कलाम यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. डॉ. कलाम यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेले सर्वच क्षेत्रातील योगदान अफाट आहे.
- रितेश देशमुख, अभिनेता
डॉ.अब्दुल कलाम यांच्या निधनाने उत्तम माणूस आपल्यातून निघून गेल्याची भावना आहे.
- अर्जून कपूर, अभिनेता
देशाच्या भविष्याची उत्तम जाण असणारे डॉ. कलाम आपल्यातून निघून गेले आहेत. डॉ.कलाम यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.
- पूनम महाजन, खासदार