कोविडच्या संकटातही शास्त्रज्ञांनी करुन दाखवलं, मोदींकडून इस्रोचं कौतुक
By महेश गलांडे | Published: November 7, 2020 05:49 PM2020-11-07T17:49:50+5:302020-11-07T17:50:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रोच्या PSLV-C49 गगनयान मोहिमेच्या यशाबद्दल इस्रो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही आपल्या शास्त्रज्ञांनी वेळचं पालन करुन निर्धारीत वेळतच PSLV चं उड्डाण करुन दाखवलं.
श्रीहरीकोटा – आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन(ISRO) ने कोरोना महामारीच्या संकटात पहिलं सॅटेलाईट शनिवारी लॉन्च केलं आहे. ISRO PSLV-C49 चं लॉन्चिंग करून भारतानं आणखी एक इतिहास घडवला आहे. दुपारी ३.०२ मिनिटांनी हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं, पीएसएलव्ही-सी 49 देशातील रडार इमेजिंग सॅटेलाईट आणि इतर ९ देशांच्या कर्मशल सॅटेलाईटसह प्रस्थान केले. इस्रोच्या या गगनभरारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन इस्रोचं अभिनंदन आणि कौतुक केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रोच्या PSLV-C49 मोहिमेच्या यशस्वी उड्डाणाबद्दल इस्रो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही आपल्या शास्त्रज्ञांनी वेळचं पालन करुन निर्धारीत वेळतच PSLV चं उड्डाण करुन दाखवलं. अवकाशयानात एकूण 10 उपग्रह पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी, अमेरिका आणि लुक्झेमबर्ग यांचे प्रत्येकी 4 असून 1 लिथुआनिया या देशाचा आहे. तर, आज उड्डाण घेतलेला भारताचा एक उपग्रह आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.
I congratulate @ISRO and India's space industry for the successful launch of PSLV-C49/EOS-01 Mission today. In the time of COVID-19, our scientists overcame many constraints to meet the deadline.
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2020
इस्त्रोनं पाठवलेल्या १० उपग्रहांपैकी ९ उपग्रह परदेशी आहेत तर १ उपग्रह भारताचा आहे. या लॉन्चिंगचा कार्यक्रम शुक्रवारी सुरु झाला होता. भारताने एडवांस्ड उपग्रह EOS-01 लॉन्च केले. हा अतिशय प्रभावी रडार आहे, हवामानाच्या प्रत्येक ऋतुमध्ये हा रडार पृथ्वीवर नजर ठेवण्यास सक्षम आहे. या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे, त्याचसोबत शेती, भूगर्भ शास्त्र आणि समुद्रकिनाऱ्यांवर नजर ठेवण्यासही उपग्रहाची मदत होणार आहे. इस्त्रोचं हे ५१ वं मिशन आहे.
'अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट' हे 'अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाइट'चेच अँडव्हान्स व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरील सुस्पष्ट फोटो टिपता येणार आहे. हा सॅटेलाईट दिवसासह रात्रीही फोटो खेचण्यात सक्षम आहे. यावर सिंथेटिक अपार्चर रडार लावण्यात आला आहे. याद्वारे कोणत्याही ऋतूत, कोणत्याही हवामानात पृथ्वीवर नजर ठेवता येणार आहे.
गगनयान मोहीम
चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात थोडक्यात अपयशी ठरल्यानंतर आता इस्रोनं गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. गगनयान भारताचं अंतराळातलं पहिलं मानवी मिशन असल्यानं इस्रोनं यासाठी अतिशय काळजीपूर्वक तयारी सुरू केली आहे. अंतराळवीरांसाठी म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं विशेष खाद्यपदार्थ तयार केले आहेत. अंतराळाचा अभ्यास करुन या खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे. डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं अंतराळवीरांसाठी एग रोल, व्हेज रोल, इडली, मूग डाळ हलवा आणि व्हेज पुलाव हे पदार्थ तयार केले आहेत. याशिवाय अंतराळवीरांसाठी विशेष ज्युसदेखील तयार केले गेले आहेत. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं. त्याचा संपूर्ण विचार करून या पदार्थांची आणि पेयांची निर्मिती करण्यात आली आहे. मिशन गगनयानसाठी विशेष भांडी आणि अन्न गरम करण्यासाठी फूड हिटरदेखील तयार केले आहेत.
इस्रो प्रमुख के. सिवन यांनी १ जानेवारीला मिशन गगनयानवर भाष्य केलं होतं. गगनयान मोहीम आता आमचं प्राधान्य असेल, असं सिवन यांनी म्हटलं होतं. भारताचं गगनयान २०२२ मध्ये अवकाशात झेपावेल. या मोहिमेसाठी हवाई दलातील ४ जणांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते रशियात प्रशिक्षण घेत आहेत. या चारही जणांनी भारत आणि रशियात वैद्यकीय चाचणी दिली असून त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत. मिशन गगनयान इस्रोची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम मानली जाते.