मोदींच्या भेटीनंतर अवघ्या ४ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलावर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:00 AM2022-04-04T09:00:10+5:302022-04-04T09:03:20+5:30
गेल्याच आठवड्यात मोदी शिंदेच्या निवासस्थानी पोहोचले होते, त्यानंतर आता ज्योतिरादित्यांच्या चिरंजीवांवर मोठी जबाबदारी
ग्वाल्हेर: केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे क्रिकेटच्या पीचवर उतरणार आहेत. महाआर्यमन यांच्याकडे ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी माजी आयएएस प्रशांत मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी महाआर्यमन शिंदे यांची निवड करण्यात आली. नव्या पिढीचा विचार लक्षात घेऊन महाआर्यमन यांना संधी देण्यात आली.
महाआर्यनन यांचे वडील ज्योतिरादित्य आणि आजोबा माधवराव शिंदे यांचं क्रिकेटशी वेगळं नातं आहे. ज्योतिरादित्य ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक आहेत. त्यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. काही दिवसांपूर्वीच महाआर्यमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी स्वत: शिंदे यांच्या निवासस्थानी आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आर्यमन मोदींच्या अगदी जवळ उभे असल्याचं दिसत होतं.
महाआर्यमन शिंदे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवतील असं म्हटलं जातं. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी वडील ज्योतिरादित्य शिंदेंसाठी प्रचार केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते ग्वाल्हेरमधल्या राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसू लागले आहेत. त्यामुळे ते लवकरच राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.