‘एससीओ’त मोदी-इम्रान यांची बैठक होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:51 AM2019-06-07T02:51:01+5:302019-06-07T02:51:26+5:30
भारताने केले स्पष्ट; पाकिस्तानशी चर्चेस नकार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेदरम्यान बैठक होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. किरगिझस्तानच्या बिश्केक या राजधानीत १३ ते १४ जून महिन्यात होणाऱ्या परिषदेला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही नेत्यांची कोणतीही बैठक ठरलेली नाही. यंदा १४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोटवर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला करून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या घटनेनंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी २७ फेब्रुवारी भारताच्या हद्दीत घुसखोरी करून बॉम्बहल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एप-१६ विमान पाडले. भारत व आंतरराष्ट्रीय दडपणामुळे अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली होती. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याकरिता भारताशी चर्चा करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र ती भारताने फेटाळून लावली होती.
‘उरी’नंतर पाकबाबत अधिक कडक धोरण
उरी येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद व काही जण जखमी झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर चर्चा करायची नाही, असा निर्णय घेतला होता. पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने पुलवामा हल्ल्यानंतर काढून घेतला होता.
पाकिस्तानातील आयात वस्तूंवर २०० टक्के शुल्क वाढविले. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहत जाणाºया नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचे ठरविल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे.