पुन्हा थप्पडकांड! भररस्त्यात महिलेची कॅब चालकाला मारहाण; कॉलर धरून कानशिलात लगावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 08:53 AM2021-11-17T08:53:03+5:302021-11-17T09:03:14+5:30
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; महिलेचं असभ्य वर्तन कॅमेऱ्यात कैद
नवी दिल्ली: भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. आता त्याच घटनेची पुनरावृत्ती दिल्लीत झाली आहे. एका महिलेनं कॅब चालकाच्या शर्टची कॉलर धरून त्याच्या थोबाडीत लगावल्या. त्याला मारहाण केली. याप्रकरणी चालकानं तक्रार दाखल केल्यास महिलेविरोधात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलं.
व्हायरल झालेला व्हिडीओ वेस्ट पटेल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. व्हिडीओमध्ये महिलेच्या स्कूटीचा नंबर दिसत आहे. त्यावरून महिलेला शोधून काढण्याचं काम पोलीस करत आहेत. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि मास्क घातलेली महिला कॅब चालकाला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भररस्त्यात महिलेची कॅब चालकाला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/tNobJBpSud
— Lokmat (@lokmat) November 17, 2021
महिला कॅब चालकाला मारहाण करत असताना तिथे उपस्थित असलेले काहीजण तिला विरोध करताना दिसत आहेत. तर अन्य लोक हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करत आहेत. वेस्ट पटेल नगरमध्ये असलेल्या लाल आनंद मार्गावरील ब्लॉक-२२ मध्ये ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
महिला एका तरुणीसोबत स्कूटीवरून जात होती. रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्यानं चालकाची कॅबदेखील वाहतूक कोंडीत अडकली होती. महिलेला चालकानं पुढे जाण्यास जागा न दिल्यानं ती संतापली. तिनं स्कूटी रस्त्यावर उभी करून चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. लोकांनी महिलेच्या वर्तनाचा विरोध केला. त्यावर ती शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊ लागली.