“मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:28 AM2024-01-02T10:28:49+5:302024-01-02T10:29:43+5:30
Ayodhya Ram Mandir News: प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तींची निवड राम मंदिरासाठी करण्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir News ( Marathi News ): २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिर उद्घाटनाची बरीचशी कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामलल्लाचा गाभारा सज्ज करण्यात आला आहे. राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तींची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी या मूर्ती साकारल्या आहेत. यानंतर अरुण योगीराज यांच्या आईने प्रतिक्रिया देताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राम मंदिरासाठी मूर्ती निश्चित करण्यात आल्यासंदर्भात माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, ज्याठिकाणी राम आहे त्याठिकाणी हनुमान आहे. अयोध्येत प्रभू राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. राम आणि हनुमानाच्या अतुट नात्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी कर्नाटकातून रामलल्लाची ही महत्त्वाची सेवा आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाणार असल्याचे पुढे आले आहे. या निर्णयानंतर अरुण योगीराज यांच्या आईने प्रतिक्रिया दिली.
आमच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण आहे
अरुण योगीराज यांच्या आईचे नाव सरस्वती आहे. त्या म्हणाल्या की, आमच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण आहे, मला ती मूर्ती घडताना पाहायचे होते, पण तो म्हणाला की, मला शेवटच्या दिवशी घेऊन जाईन. आता मी प्रतिष्ठापनाच्या दिवशी जाईन. माझ्या मुलाची प्रगती आणि यश पाहून मला आनंद झाला आहे. माझा मुलगा गेले सहा महिने अयोध्येत आहे, अशी प्रतिक्रिया सरस्वती यांनी दिली.
दरम्यान, अरुण योगीराज हे कर्नाटकच्या म्हैसूर शहरात राहणारे आहेत. ते एका प्रसिद्ध मूर्तीकार कुटुंबातून येतात. त्यांच्या ५ पिढ्या मूर्त्या बनवण्याचे काम करतात. अरुण योगीराज हे देशातील प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक आहेत. देशातील विविध राज्यात अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीला सर्वाधिक मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या मूर्ती बनवण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुण योगीराज यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. २००८ मध्ये कंपनीतून राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ मूर्तीकार म्हणून काम केले.