महिला शिक्षिकेच्या घरात जाणं चांगलंच महागात, उपजिल्हाधिकाऱ्यावर गावकऱ्यांची धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:43 AM2022-08-16T10:43:18+5:302022-08-16T10:45:58+5:30
जिल्ह्यातील मारवाड प्रदेशातील गुडा मोकमसिंह येथे राहणाऱ्या महिला शिक्षिकेच्या घरी एसडीएम अजय अमरावत यांचं जाणं-येणं असल्याची चर्चा होती
जयपूर - राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील एका सरकारी शिक्षकाच्या घरी रात्री उशिरा येणं अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी एसडीएम म्हणजे उपजिल्हाधिकारी अजय अमरावत मारवाड स्टेशन यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, महिला शिक्षिकेचंही निलंबन करण्यात आलं आहे. यापूर्वी शिक्षिकेला एपीओ नोटीस बजावण्यात आली होती.
जिल्ह्यातील मारवाड प्रदेशातील गुडा मोकमसिंह येथे राहणाऱ्या महिला शिक्षिकेच्या घरी एसडीएम अजय अमरावत यांचं जाणं-येणं असल्याची चर्चा होती. याच दरम्यान, एका रात्री संबंधित अधिकारी गुपचूप आपल्या कारमधून उतरत महिला शिक्षिकेच्या घरी गेले. त्याचवेळी गावकऱ्यांनी घराला बाहेरुन कुलूप लावलं. तसेच, बाहेर उभी असलेल्या अधिकाऱ्याच्या कारची हवाही सोडून दिली.
सकाळी येथील शिक्षिकेनं दरवाजा उघडण्यासाठी गावकऱ्यांना आवाज दिला, तसेच पोलिसांत तक्रार करण्याचीही धमकी दिली. त्यानंतर, गावकऱ्यांनी दरवाजा उघडला असता, घरात कोणीही नसल्याचे सांगत शिक्षिका शाळेला निघून गेली. मात्र, गावकऱ्यांना पहारा करणं सोडलं नाही, त्यामुळे तब्बल 16 तास एसडीएमला महिला शिक्षिकेच्या घरात डांबून राहावं लागलं. त्यावेळी, जोजावर पोलीस ठाण्यातील कर्मचारी साधारण ड्रेसकोडमध्ये याठिकाणी पोहोचले आणि एसडीएमला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यावेळी, एसडीएमने आपल्या तोंडावर रुमाल बांधल्याचं दिसून आलं.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य विभाग शिक्षणाधिकारी शंकर सिंह उदावत यांनी आदेश जारी करत शिक्षिकेला एपीओ नोटीस बजावली. तसेच, अधिकाऱ्यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, एसडीएमविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, मारवाड येथील माजी आमदार केसाराम चौधरी यांनी एसडीएमविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली. तसेच, संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करु देणार नसल्याचा इशारीही दिला. त्यानंतर, जिल्हा प्रशासनाने एसडीएमवर कारवाई करत त्यांचे निलंबन केले. राजस्थान सिव्हील सेवेत दोषी मानून त्यांना निलंबित करण्यात आले. सध्या जिल्ह्यात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.