राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:08 PM2024-01-23T18:08:24+5:302024-01-23T18:10:41+5:30
अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अजूनही अनेक रामभक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.
Ayodhya Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होताच रामललांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं होताच राम मंदिरात गर्दी एवढी वाढली की प्रशासनाला अयोध्येकडे जाणारे रस्ते बंद करावे लागले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव संजय प्रसाद हे मैदानात उतरले आहेत. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील आयोध्येत दाखल झाले.
मंदिरात काल रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज सकाळी आरती करण्यात आली आणि त्यानंतर रामभक्तांना दर्शनासाठी सोडलं जाऊ लागलं. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही भक्तांची गर्दी कमी झाली नाही. अजूनही अनेक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे लगेच अयोध्येत येणं टाळा, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून केलं जात आहे.
सकाळच्या सुमारास गर्दी वाढल्यानंतर तपासणीसाठी लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पाडत लोकांनी आत प्रवेश केला. लोकांची ही गर्दी पोलीस प्रशासन हतबलपणे बघत होते.
दरम्यान, गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी राम मंदिर परिसरात दाखल झाले. त्यानंतर प्रशांत कुमार हे स्वत: परिस्थितीचा आढावा घेत होते.