सीमोल्लंघन!

By admin | Published: September 30, 2016 05:24 AM2016-09-30T05:24:24+5:302016-09-30T05:24:24+5:30

पाकिस्तानने मात्र भारताने पीओकेत घुसून हल्ला केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. भारत चक्क खोटे बोलत असल्याचा दावाही पाकने केला असून, तेथील प्रसार माध्यमांनी भारत सरकार

Seamlanghan! | सीमोल्लंघन!

सीमोल्लंघन!

Next

- नबीन सिन्हा/सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

पाकिस्तानने मात्र भारताने पीओकेत घुसून हल्ला केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. भारत चक्क खोटे बोलत असल्याचा दावाही पाकने केला असून, तेथील प्रसार माध्यमांनी भारत सरकार स्वत:च्या जनतेचीच फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे. उरी येथील लष्करी तळावरील हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कराने बदला घेत दहशतवाद्यांना ठेचले. बुधवारच्या रात्रीनंतर भारतीय लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांच्या शिबिरांवर हल्ले केले, अशी घोषणा डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी केली.
‘नियंत्रण रेषेलगतच्या लाँचपॅडवर काही दहशतवादी भारतीय सीमेत घुसून जम्मू-काश्मीर आणि देशाच्या इतर भागांत हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय आणि पक्की माहिती आम्हाला बुधवारी मिळाली होती. या माहितीच्या आधारावर भारतीय लष्कराने मध्यरात्रीनंतर ही धडक कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांचे सर्व सातही लाँचपॅड नष्ट करण्यात आले, ज्यात ३८ दहशतवादी आणि त्यांचे गाईड मारले गेल्याचा अंदाज आहे,’ असे जनरल सिंग यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सुरक्षेवरील कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर लगेच जनरल सिंग यांनी पत्रपरिषद बोलावून त्यात ही घोषणा केली.
दहशतवाद्यांनी भारतात घुसून निष्पाप जीवांचे बळी घेऊन नयेत, हाच या हल्ल्यामागचा मूळ हेतू होता. या कारवाईत अनेक दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे मारले गेल्याचा अंदाज आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करणे हा मूळ उद्देश असला तरी कारवाई पुढेही सुरू ठेवण्याची योजना नाही. तथापि भारतीय सेना कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे रणबीर सिंग म्हणाले. पाकच्या डीजीएमओना कारवाईची माहिती दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतातर्फे नियंत्रण रेषेलगतच्या हल्ल्याचा निषेध केला. आपल्या देशाच्या संरक्षणास पाक सेना सक्षम आहे. पाकला शेजारी देशांसोबत शांततामय संबंध हवे आहेत. पण याचा अर्थ पाक दुबळा आहे असे कुणी
समजू नये, असे शरीफ यांनी म्हटले
आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात दोन पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

अशी केली मोहिम फत्ते..
दहशतवादी गट भारतात घुसखोरी करून हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच लष्कराने पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगतच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला.
- विशेष दलाने बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटे ४.३० वाजेपर्यत सीमेपलीकडे ५०० मीटर ते दोन किमीच्या क्षेत्रात धडक कारवाई केली.
- पाकव्याप्त काश्मिरातील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल व लिपा या चार क्षेत्रात हा हल्ला केला. पाक सेनेच्या प्रसिद्धी विभागानेही या संघर्षाची कबुली दिली आहे.
- लष्कराने या धाडसी कारवाईत सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून अंदाजे ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
- लष्कराच्या विशेष दलाचे कमांडो हेलिकॉप्टर तेथे उतरले
आणि चार तासात मोहीम फत्ते करून सुखरूप परतले. मात्र या मोहिमेमध्ये भारतीय हवाई दलाचा सहभाग नव्हता. या मोहिमेनंतर सीमेलगत १० किलोमीटरचा परिसर रिकामा केला आहे.

Web Title: Seamlanghan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.