आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांचा शोध; वाचनप्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम
By Admin | Published: October 15, 2015 02:59 AM2015-10-15T02:59:07+5:302015-10-15T02:59:07+5:30
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी राज्यातील काही लेखक, पत्रकार, वाचक व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्याला वळण देणारी किंवा प्रभावित करणारी तीन पुस्तके कोणती
अहमदनगर : वाचन प्रेरणा दिनानिमित्त शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी राज्यातील काही लेखक, पत्रकार, वाचक व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्याला वळण देणारी किंवा प्रभावित करणारी तीन पुस्तके कोणती’ असा प्रश्न करत घेतलेल्या शोधातून ८०० पेक्षा जास्त पुस्तकांची यादी तयार झाली आहे. यातून निवडक २२५ पुस्तकांची यादी करण्यात आली आहे़
राज्यातील आजी-माजी मंत्र्यांसह अनेकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांची नावे सांगितली. माणसाच्या आयुष्यावर पुस्तक परिणाम करते म्हणजे नेमके काय करते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे, असे कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘मराठीत गेली अनेक वर्षे वाचली जाणारी पुस्तकेच डिजिटल काळातही प्रभावित करत आहेत, असे या यादीवरून लक्षात येते़ या माध्यमातून उच्च अभिरुची असणारे आणि उत्कृष्ट इंग्रजी वाचन करणारे अनेक वाचक भेटले,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. राजन गवस, सुनील कर्णिक, सुबोध जावडेकर, लक्ष्मण माने, भानू काळे, नंदा खरे, अरुण गद्रे, जयंत पवार, अतुल देऊळगावकर, शोभा भागवत, जयराज साळगावकर, विनोद शिरसाठ, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक, राजीव तांबे,
प्रमोद मुनघाटे अशा अनेकांनी त्यांना पुस्तके सुचविली. (प्रतिनिधी)
>> शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री व ‘लोकमत’चे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा व बाळासाहेब थोरात यांनी तीन पुस्तके सांगितली़ तावडे यांनी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’, रिचर्ड बचचे ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल’ आणि एकनाथ रानडे यांचे ‘सेवा साधना’ ही पुस्तके आयुष्यावर प्रभाव टाकणारी वाटतात, असे सांगितले. माजी मंत्री व ‘लोकमत’चे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांना मिच अल्बोमचे ‘थर्सडे विथ मॉरी’, पंडित नेहरू यांचे ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ आणि रा़ भा़ पाटणकर यांचे ‘अपूर्ण क्रांती’ ही पुस्तके जीवनावर प्रभाव टाकणारी वाटतात़ पुरके यांना ‘तुकारामाची गाथा’ ओशो रजनीश यांचे ‘शिक्षा मे क्रांती’ व बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ही पुस्तके प्रभावित करून गेली़ बाळासाहेब थोरात यांना मानवेंद्रनाथ रॉय यांचे चरित्र, योगी अरविंदांचे साहित्य आणि गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ जीवनाला वळण लावणारे ठरले, असे वाटते.