रतन टाटा मिस्त्री परिवाराकडील शेअर्ससाठी खरेदीदाराच्या शोधात
By admin | Published: October 28, 2016 12:51 PM2016-10-28T12:51:41+5:302016-10-28T12:51:41+5:30
सायरस मिस्त्री यांच्या परिवाराकडे असलेल्या टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी खरेदीदाराचा शोध रतन टाटा घेत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. 28 - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे असलेल्या समूहातील शेअर्सच्या खरेदीसाठी टाटा ट्रस्टकडून खरेदीदाराचा शोध सुरु आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाने समूहातील शेअर्स विक्रीसंबंधी कोणाताही निर्णय घेतलेला नाही. पण उद्या त्यांनी विक्रीचा निर्णय घेतलाच तर नवा खरेदीदार समूहाला अनुकूल असावा या दृष्टीकोनातून नव्या खरेदीदारांचा शोध सुरु आहे.
याबाबत टाटा परिवाराच्या विश्वस्त मंडळाने सार्वभौम संपत्ती निधी आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणाऱ्यांकडे मिस्त्री यांच्याकडील शेअर्स विक्रीस उपलब्ध झाल्यास खरेदी करण्याविषयी चाचपणी केली. शेअर खरेदी करण्याची क्षमता असलेल्यांसोबत टाटा ट्रस्टने प्राथमिक स्वरूपाची बोलणी केली आहे. मिस्त्री परिवाराकडे टाटा सन्सचे 18 टक्के शेअर असून, त्यांच्याकड़ून या शेअर्सच्या विक्रीबाबत कोणतेही संकेत अद्याप देण्यात आलेले नाहीत.
टाटा समुहाच्या मालकीच्या कंपन्यामध्ये गुंतवलेल्या भागभांडवलाच्या विक्रीबाबत मिस्त्री परिवाराने भूमिका स्पष्ट करावी, यासाठी टाटा परिवार ट्रस्ट प्रयत्नशील आहे. तसेच नवे गुंतवणुकदार हे दीर्घकालीन दृष्टीकोन समोर ठेवून गुंतवणूत करतील, टाटा परिवाराला विश्वास आहे. दरम्यान, "मिस्त्री परिवाराने टाटा समुहामधील आपल्या भागभांडवलाची विक्री केल्यास टाटा समुहाभोवतीची बहुतांश अनिश्चितती दूर होईल," असे अशिका स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष पारस बोथ्रा यांनी सांगितले.
टाटा समुहाचे चेअरमन असलेल्या सायरस मिस्त्री यांना सोमवारी तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर टाटा समुहाच्या संचालक मंडळाचा कार्यभार रतन टाटा यांच्याकडे सोपवण्यात आला होता.