जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:00 AM2024-09-22T07:00:00+5:302024-09-22T07:00:13+5:30
पुरातत्त्व विभागाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू
पुरी : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे अर्थात रत्न भंडाराचे दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक सर्वेक्षण शनिवारी सुरू केले. तीन दिवस हे सर्वेक्षण सुरू राहील. या रत्न भंडारातील गुप्त तळघरांचे किंवा बोगद्यांचे रहस्य उलगडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षणाद्वारे या रचनेचा शोध घेतला जात आहे. आत आणखी एखादा गुप्त खजिना आहे का, याची तपासणी लेझर स्कॅनर्सद्वारे करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हे रहस्य उलगडणार आहे.
या काळात दुपारी १ ते ६ दरम्यान मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात लेझर स्कॅनिंग
सर्वेक्षणाचा पहिला टप्प्या १८ सप्टेंबर रोजी पार पडला होता.
या टप्प्यात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक जान्हवीज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय तांत्रिक पथकाने मुख्य प्रशासक पाधी व न्या. रथ यांच्या उपस्थितीत लेझर स्कॅनिंगच्या माध्यमातून निरीक्षण केले होते.
या पथकात औद्योगिक संशोधन परिषद तसेच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या हैदराबाद येथील तज्ञांचा समावेश होता.
२४ तारखेपर्यंत पूर्ण करावयाचे आहे सर्वेक्षण
मंदिर समितीने १८ सप्टेंबर रोजी पुरातत्व विभागाला पत्र पाठवून दसरा तसेच कार्तिक महिन्यातील पूजा-पाठाचे महत्त्व पाहता २४ सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची विनंती केली होती.
मंदिरात नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा पूजा २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल दाखल करावा, असेही पत्राद्वारे कळवण्यात आले होते.
अदृश्य कप्पा वा बोगदा आहे का, हे शोधणार
मंदिराच्या रत्न भंडार सूची समितीचे अध्यक्ष न्या. बिश्वनाथ रथ यांनी सांगितले, २१ ते २३ सप्टेंबर असे तीन दिवस दुसऱ्या टप्प्यातील हे सर्वेक्षण होईल. रत्न भंडारामध्ये एखादा अदृश्य कप्पा किंवा बोगदा आहे का, याची पडताळणी या काळात केली जाईल.
अंतर्गत भंडार
५०.६ किलाे साेने
१३४.५० किलाे चांदी
कधीच वापर झाला नाही
बाह्य भंडार
९५.३२ किलाे साेने
१९.४८ किलाे चांदी
सणासुदीलाच बाहेर काढतात.
सध्याचे भंडार
३.४८ किलाे साेने
३०.३५० किलाे चांदी
धार्मिक विधींसाठी वापर.