‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:25 AM2021-05-28T09:25:05+5:302021-05-28T09:25:28+5:30
cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत.
कोलकाता : यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचे नुकसान झाले असून, या स्थितीने हवालदिल झालेले लोक आता केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची वाट पाहात आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्हा तसेच शंकरपूर या भागांना यास वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. तेथील असंख्य वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या भागामध्ये चक्रीवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाल्याने जे लोक बेघर झाले आहेत ते एकतर आपल्या नातेवाइकांच्या घरी राहायला गेले आहेत किंवा अक्षरश: रस्त्यावर राहात आहेत. शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या पुतुल याने सांगितले की, यास चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात माझे घर वाहून गेले.
अनेक गावे पुराच्या वेढ्यात
पश्चिम बंगालमधील मिदनापूर व शंकरपूरप्रमाणेच यास चक्रीवादळाने बंकुरा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम या जिल्ह्यांनाही तडाखा दिला आहे. तेथील सुमारे १,१०० गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्या भागात सुमारे ५० हजार लोक बेघर झाले आहेत. यास वादळाचा काही प्रभाव गुरुवारीही शिल्लक होता. या दिवशी कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी उत्तर, दक्षिण २४ परगणा, मुशिराबाद येथे पाऊस पडला.