शाहजहान शेख याच्या घर, कार्यालयाची झडती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:15 PM2024-03-09T14:15:23+5:302024-03-09T14:16:26+5:30
या ठिकाणांहून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या संदेशखालीमधील घर व कार्यालयाची सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी झडती घेतली. या ठिकाणांहून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
शाहजहान शेखवर संदेशखालीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या तसेच जमिनी बळकावल्याचे आरोप असून त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याला तृणमूल काँग्रेसने पक्षातून निलंबित केले होते. ईडीच्या पथकावरील हल्ल्यासंदर्भात शाहजहान शेखच्या घराजवळ असलेल्या अकुंचीपाडा या नागरी वस्तीतून सीबीआयच्या पथकाने पुरावे गोळा केले आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे ५ जानेवारी रोजी ईडीच्या पथकावर हल्ला झाला होता.
सीबीआयचे सहा अधिकारी, सहा फोरेन्सिक अधिकारी, तसेच ५ जानेवारीला हल्ल्यात जखमी झालेले ईडीचे दोन अधिकारी अशांचा समावेश असलेले एक पथक शुक्रवारी संदेशखालीत शाहजहान शेखच्या घरी गेले होते. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)