डेराच्या मुख्यालयात सर्च ऑपरेशन; जाणून घ्या काय-काय सापडलं डेरा मुख्यालयात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:07 PM2017-09-08T17:07:18+5:302017-09-08T17:10:31+5:30
हरियाणामधील सिरसा येथील राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशनला राबवलं आहे.
सिरसा, दि.8- हरियाणामधील सिरसा येथील राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशनला राबवलं आहे. या सर्च ऑपरेशनच्या आतापर्यंतच्या तपासणीत पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना रोख रक्कम आढळली आहे. डेरा मुख्यालयातील पाच खोल्या तपास पथकाने सील केल्या आहेत. यापैकी दोन खोल्या पैशांनी भरलेल्या असल्याची माहिती मिळते आहे. तपासणीदरम्यान पोलिसांना काही हार्ड डिस्क सापडल्या आहेत. डेऱ्यात वापरलं जाणारं प्लॅस्टिकचं चलनही तपासात सापडलं असून याच चलनाच्या माध्यमातून डेऱ्यातील सर्व व्यवहार केले जायचे, अशी माहिती समोर आली आहे. तसंच राम रहिमच्या मुख्यालयात काळ्या रंगाची, नंबर प्लेट नसलेली आलिशान गाडी पोलिसांना सापडली. विशेष म्हणजे टीव्ही चॅनेलवर लाइव्ह टेलिकास्ट करण्यासाठी वापरली जाणारी ओबी व्हॅनही आढळून आली आहे. डेराच्या मुख्यालयातील काही संशयित ठिकाणी खोदकामही केलं जातं आहे.
Haryana: Found in markets near Dera Sacha Sauda's Headquarter in Sirsa-"Gurmeet Ram Rahim's plastic currency" pic.twitter.com/ZwhlJtSl70
— ANI (@ANI) September 8, 2017
राम रहिमच्या डेऱ्यात प्लॅस्टिकच्या चलनांचा वापर केला जायचा, असं समजतं आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील चलनासारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या चलनांना डेऱ्यात विशेष महत्त्वं होतं, अशी माहिती राम रहिमच्या अनुनायांनी दिली आहे. डेरा परिसरातील दुकानांमध्येसुद्धा प्लॅस्टिकचं चलन स्वीकारलं जायचे. प्लॅस्टिकच्या या चलनांवर ‘धन धन सद्गुरु तेरा ही आसरा, डेरा सच्चा सौदा सिरसा,’ असं वाक्य आहे. डेऱ्याची तपासणी करणाऱ्या पोलीस पथकाला १० रुपये मूल्य असलेले केशरी रंगाचे आणि १ रुपये मूल्य असलेलं निळ्या रंगाच प्लॅस्टिकचं चलन आढळून आलं आहे.
बाबा राम रहिमचा सिरसामधील डेरा 800 एकर परिसरात पसरला आहे. यामध्ये शाळा, हॉस्पिटल, दुकानं, मल्टिप्लेक्स आणि सेव्हन स्टार रिसॉर्टचा समावेश आहे. हरियाणा पोलीस, निमलष्करी दल, दंगलविरोधी पथक, बॉम्बविरोधी पथक, अग्निशमन दलाच्या गाड्या असा संपूर्ण ताफा डेरा परिसरात सध्या शोध मोहिम राबवत आहे. याशिवाय लष्कराच्या ४ तुकड्यादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ५ ड्रोन्सच्या मदतीने या परिसरावर नजर ठेवली जात असून फॉरेन्सिक टीमही डेऱ्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी तपास १० विभागांमध्ये विभागला असून त्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत.