लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:00 AM2018-01-07T00:00:35+5:302018-01-07T00:00:49+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या खा. मिसा भारती यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या खा. मिसा भारती यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.
मिसा भारती यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र २३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत याआधी भारती यांचे दिल्लीतील एक फार्म हाऊस जप्त करण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीच्या बिजवासन भागातील २६, पालम फार्म्स येथे हे फार्म हाऊस आहे.
हे फार्म हाऊस मिसा भारती आणि शैलेश कुमार या दोघांच्या संयुक्त मालकीचे आहे. ते मे. मिशैल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रा. लि. या
संस्थेच्या नावे खरेदी करण्यात आले होते. ही संस्था दोघांच्या मालकीची आहेत.
ईडीच्या आरोपानुसार, फार्म हाऊसची किंमत १.२ कोटी रुपये असून, २००८-०९ मध्ये मनी लाँड्रिंगच्या पैशांतून ते खरेदी करण्यात आले होते. याप्रकरणी ईडीने जुलै महिन्यात या फार्म हाऊसवर छापा मारला होता. सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोन भावांसह इतर काही जणांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करून पैसा उभा केल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)