लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेवाला कोरोनाची लागण, सुरू होण्याआधीच संपला नव्या नवरीचा संसार....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:56 PM2021-05-11T15:56:33+5:302021-05-11T15:56:51+5:30
गावातील लोक कोरोना गाइडलाईनचं पालन करताना दिसत नाहीत. याचं ताजं उदाहरण राजस्थानच्या जालोरमध्ये बघायला मिळालं.
कोरोनाची दुसरी लाट काही राज्यांमध्ये दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. शहरांमध्येच नाही तर आता गावांमध्येही कोरोनामुळे लोकांचे जीव जात आहेत. गावांमधील लोकांचा बेजबाबदारपणामुळे त्यांनाच महागात पडत आहे. तरी गावातील लोक कोरोना गाइडलाईनचं पालन करताना दिसत नाहीत. याचं ताजं उदाहरण राजस्थानच्या जालोरमध्ये बघायला मिळालं. इथे लग्नाच्या काही दिवसात नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
कोरोनामुळे स्थिती गंभीर असूनही काही ठिकाणी लग्न सोहळ्यात जास्त लोक एकत्र जमत आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर कमी दिसतो आहे. याचाच परिणाम म्हणजे एक नव्या नवरीचा संसार सुरू होण्यआधीच संपला. ती विधवा झाली. लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तब्येत जास्त बिघडली म्हणून त्याला जालोरमधून सिलोर आणि नंतर पालनपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हे सगळं काही ९ दिवसात झालं. नवव्या दिवशी सायंकाळी एक तरूण कोरोनाशी लढा हरला.
जालोरच्या रायपुरिया येथील ईश्वर सिंह देवडा यांची मुलगी कृष्णा कंवरचं लग्न ३० एप्रिल २०२१ ला जालोरच्या बैरठ येथील शैतान सिंहसोबत झालं. कोरोना काळात निष्काळजीपणा नवरदेवाला भोवला. लग्नावेळी मास्क न लावणं, सोशल डिस्टंसिंग न ठेवणं नवरदेवाला महागात पडलं.
३० एप्रिलला लग्न झालं. १ मे रोजी गृहप्रवेशही झाला. अशात नवरदेवाची तब्येत बिघडली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्याची शुगर लेव्हल ६०० पर्यंत पोहोचली होती. हळूहळू तब्येत जास्त बिघडली. नंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ९ मे रोजी सायंकाळी शैतान सिंहने अखेरचा श्वास घेतला. त्याची नवी नवरी संसार सुरू होण्याआधीच विधवा झाली.