पु्न्हा भूकंप, नेपाळ व उत्तर भारत हादरला
By admin | Published: May 12, 2015 12:59 PM2015-05-12T12:59:52+5:302015-05-12T20:50:47+5:30
मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नेपाळ व उत्तर भारत हादरला असून नेपाळमध्ये २९ तर भारतात १७ जण ठार झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - नेपाळमध्ये अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून नेपाळमध्ये २९ तर बारतात १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नेपाळमधील कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी होती. तेथे सुमारे ९८१ जण जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपात सात हजाराहून अधिक जण ठार तर १५ हजारांहून अधिक जखमी झाले होते. नेपाळवासी त्या धक्यातून सावरत असतानाच आज त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला.
मंगळवारी दुपारी १२.३५ मिनीटांनी व १२.३८ मिनीटांनी नेपाळमध्ये मोठ्या तीव्रतेचे धक्के बसले. यातील पहिला भूकंपाचा केंद्रबिंद कोडारी येथे होता तर दुसरा भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळ - चीन सीमारेषेजवळ होता. पहिला भूकंप ७.१ तर दुसरा भूकंप ७.४ रिश्टर स्केल ऐवढा तीव्रतेचा होता. यानंतर आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. लागोपाठ आलेल्या तीन भूकंपाचे धक्के उत्तर व पूर्व भारतातील दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, ओदिशा अशा अनेक राज्यांमध्येही जाणवले. गुजरातमधील अहमदाबादपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अफगाणस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपात जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भूकंपामुळे पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरले आहे. भूकंपानंतर नेपाळचे काठमांडू विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून भारतातही खबरदारी म्हणून दिल्ली, कोलकाता येथील मेट्रो सेवा बंद करण्यात आली. तर सुप्रीम कोर्टाचे कामकाजही काही वेळ थांबवण्यात आले होते. येत्या ३० मे पर्यंत नेपाळमधील सर्व शाळाही बंद राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालय भूकंपाविषयीची माहिती घेत असून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.