दुसरा चमत्कार पोपनी स्वीकारला, मदर तेरेसांना संतपद मिळणार
By admin | Published: December 18, 2015 02:53 PM2015-12-18T14:53:19+5:302015-12-18T14:53:19+5:30
मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १८ - मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती कोलकात्याच्या आर्चबिशपनी दिली आहे. कोलकात्यातल्या रस्त्यावरच्या गरीबांना तसेच रुग्णांना आधार देणा-या मदर तेरेसांना यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
ख्रिश्चन धर्मामध्ये चमत्कार सिद्ध करणा-यांना चर्च संतपद देते. आणि मृत्यूनंतरही चमत्कार घडू शकतो अशी श्रद्धा आहे. ब्रेन ट्युमरमुळे अंथरुणाला खिळलेल्या एका ब्राझिलच्या रुग्णाला मदर तेरेसांनी २००८ मध्ये म्हणजे मृत्यूनंतरही बरे केल्याचा चमत्कार केल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारल्याचे आर्चबिशप थॉमस डिसोझांनी सांगितले. मदर तेरेसांचा दुसरा चमत्कार स्वीकारण्यात आल्याचे मला रोममधून कळवण्यात आल्याचे डिसोझा यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
मूळच्या अल्बानियातल्या तेरेसांनी भारतात आपले आयुष्य व्यतित केले. त्या १९९७ साली वयाच्या ८७व्या वर्षी भारतातच मरण पावल्या.
मदर तेरेसांबरोबर काम केलेल्या त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी या वृत्ताबद्दल संतोष व्यक्त केला आहे. माझ्या जिवंतपणी मदर तेरेसांना संतपद मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया सुनीता कुमार यांनी व्यक्त केली आहे.