तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 02:24 AM2019-07-15T02:24:39+5:302019-07-15T06:52:57+5:30

इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे

Second moon mission called off due to technical glitch | तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित

तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित

Next

नवी दिल्लीः ‘चांद्रयान 2’ चे बहुप्रतिक्षित प्रक्षेपण सोमवारी काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात आले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार हे चांद्रयान सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटाला झेपावणार होते आणि त्यासाठी काऊंटडाऊनही सुरू झाले होते. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना काही तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली. आता या प्रक्षेपाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 2चे उड्डाण होणार होते. इस्रोनं पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन नियोजित वेळेच्या जवळपास 56 मिनिटांपूर्वीच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे आज चांद्रयान 2 मोहिमेचं प्रक्षेपण होणार नाही. यामागे तांत्रिक कारण सांगण्यात येत आहे. इस्रो लवकरच नवी तारीख जाहीर करणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेसाठी श्रीहरिकोट्यात जवळपास तयारी पूर्ण झाली होती. परंतु मोहीम सुरू होण्यापूर्वीच इस्रोच्या शास्त्रज्ञांना काही तांत्रिक त्रुटी लक्षात आल्या. त्यामुळे त्यांना ही मोहीम तात्पुरती स्थगित करावी लागली.


भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपास्त्राच्या साह्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच इस्रोनं ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. या मोहिमेसाठी इस्रोचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर बसवण्यात आली आहे. मोहिमेतील सर्व यंत्रणा या भारतीय बनावटीच्या आहेत. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार होते.
इस्रोच्या माहितीनुसार, या मोहिमेला रद्द करण्यात आलेले नाही. लवकरच नवी तारीख जाहीर करून या मोहिमेला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यात येणार असल्याचंही इस्रोनं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार होती.

Web Title: Second moon mission called off due to technical glitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.