हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:19 PM2024-02-02T16:19:32+5:302024-02-02T16:20:25+5:30

हेमंत सोरेन यांना PMLA कोर्टाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

second set back for Hemant Soren today PMLA court orders ED custody for 5 days | हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी

हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी

Hemant Soren ( Marathi News ) : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एकाच दिवशी दुहेरी धक्का बसला आहे. सोरेन यांच्यावतीने ईडी कारवाईला आव्हान देत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर PMLA कोर्टाने सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीकडून हेमंत सोरेन यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र PMLA कोर्टाने सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

हेमंत सोरेन यांना ईडीने कथित जमीन व्यवहारातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर या अटकेविरोधात सोरेन यांच्याकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देऊन सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारला की, तुम्ही आधी हायकोर्टात का गेला नाही? कोर्ट सर्वांसाठी खुले आहे. हायकोर्टातही या मुद्द्यावर सुनावणी करून योग्य ते आदेश देण्यास सक्षम आहे. तुमच्या याचिकेवर थेट सुनावणी झाली तर आम्हाला सर्वांची थेट सुनावणी करावी लागेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. कोर्ट सर्वांसाठी समान आहे.  

झारखंडला मिळाले नवे मुख्यमंत्री

झारखंडमध्ये आज नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. राज्यपालांनी नवीन सरकार बनविण्याचा प्रस्ताव काही झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला दिला नव्हता. अखेर पुन्हा भेट घेतल्यानंतर चंपई सोरेन यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झामुमोचे नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सरकारला १० दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. घोडेबाजार सुरु होण्याच्या भीतीने झामुमो आणि काँग्रेसने त्यांच्या आमदारांना हैदराबादला हलवलं आहे.


 

Web Title: second set back for Hemant Soren today PMLA court orders ED custody for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.