प्रतीक्षायादीवरील प्रवाशांसाठी लगेच धावणार दुसरी रेल्वेगाडी

By admin | Published: May 30, 2016 04:31 AM2016-05-30T04:31:53+5:302016-05-30T04:31:53+5:30

प्रतिक्षायादीतील तिकिट ‘कन्फर्म’ न झालेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी मूळ गाडी रवाना झाल्यावर त्याच मार्गावर तासाभरात दुसरी गाडी चालविण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन विचार

Second train to be run immediately for passengers on the waiting list | प्रतीक्षायादीवरील प्रवाशांसाठी लगेच धावणार दुसरी रेल्वेगाडी

प्रतीक्षायादीवरील प्रवाशांसाठी लगेच धावणार दुसरी रेल्वेगाडी

Next


नवी दिल्ली : शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहूनही प्रतिक्षायादीतील तिकिट ‘कन्फर्म’ न झालेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी मूळ गाडी रवाना झाल्यावर त्याच मार्गावर तासाभरात दुसरी गाडी चालविण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन विचार करीत असून येत्या जूनपासून भरगच्च गर्दीच्या मार्गांवर अशा गाड्या धावू लागतील, अशी अपेक्षा आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लगोलग सोडल्या जाणाऱ्या अशा गाड्यांना ‘क्लोन ट्रेन’ असे संबोधून सांगितले की, यामुळे वेळापत्रातील मूळ गाडीत जागा मिळू न शकलेल्या प्रवाशांना प्रवासाच्या योजनेवर पूर्णपणे पाणी सोडण्याच्या निराशेऐवजी आरक्षित आसनावर आरामशीर प्रवास करून तास-दोन तासांच्या विलंबाने इच्छित स्थळी पोहोचण्याचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध होईल.
गाड्यांच्या क्षमतेहून नेहमीच कितीतरी पटीने गर्दी असणारे अनेक मार्ग असले तरी अशा ‘क्लोन ट्रेन’ नेमक्या कुठून सोडणे शक्य होईल, याचा आढावा घेण्यात येत आहे. याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यावर कदाचित जूनपासून प्रत्यक्षात अशा पाठोपाठ धावणाऱ्या पर्यायी गाड्यांची योजना प्रत्यक्ष सुरु होऊ शकेल, असे हा अधिकारी म्हणाला.
प्रवाशांच्या मागणीचा अंदाज घेऊन अल्पावधीत अशा गाडीची व्यवस्था करण्यासाठी रिकामे डबे व जास्तीची इंजिने यांची उपलब्धता ही गरजेची बाब असेल. त्यादृष्टीने जेथे रेल्वेची मोठी कोचिंग यार्ड्स आहेत व जेथे डबे जोडून लगेच गाडी तयार करण्याची सोय व जास्तीची इंजिने मिळू शकते अशा मुंबई सीएसटी, तेन्नई, सिकंदराबाद व नवी दिल्ली अशा मोठ्या स्थानकांवरून अशा ‘क्लोन ट्रेन’ सोडल्या जाऊ शकतील.
या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, एखाद्या मार्गावर अशी ‘क्लोन ट्रेन’ सोडण्याची गरज आहे की नाही याचा आधीच अंदाज यावा व त्यानुसार तयारी करणे शक्य व्हावे यासाठी प्रतिक्षायादीवरील आरक्षण देण्यावर सध्या असलेली मर्यादा काढून टाकण्याचा विचार आहे. सध्या कोणत्याही रेल्वेगाडीसाठी स्लीपर क्लासला ४००पर्यंत, थ्री टियर एसी किंवा चेअर कारसाठी ३०० पर्यंत, पहिल्या वर्गात ३० पर्यंत व दुसऱ्या वर्गासाठी १०० पर्यंत प्रतिक्षायादीवरील तिकिटे दिली जातात.
प्रतिक्षायादीवरील ही मर्यादा काढून टाकली की एखाद्या दिवशी, एखाद्या मार्गावरील ठराविक गाडीसाठी कमाल किती प्रवाशांची मागणी आहे, याचा नेमका अंदाज येईल. प्रवाशांना आरक्षण करतानाच नियमित गाडीचे तिकिट ‘कन्फर्म’ झाले नाही तर ‘क्लोन ट्रेन’च्या आरक्षणाचा पर्याय दिला जाईल. जे हा पर्याय निवडतील त्यांचे नियमित गाडीतील तिकिट ‘कन्फर्म’ न झाल्यावर त्यांना आपोआप ‘क्लोन ट्रेन’चे आरक्षण मिळेल व त्यांना तसे कळविले जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सध्याच्या व्यवस्थेत प्रतिक्षायादीवरील तिकिट गाडी सुटेपर्यंत ‘कन्फर्म’ न झाल्यास त्याचा परतावा प्रवाशाच्या खात्यात आपोआप जमा होतो. हाती आलेला महसूल अशा प्रकारे घालविण्यापेक्षा तो पर्यायी व्यवस्था करून खिशात घालणे, हाही रेल्वेचा यामागचा हेतू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>‘विकल्प’ व ‘क्लोन’ निरनिराळे
रेल्वेने अलिकडेच ‘कन्फर्म’ तिकिट न मिळालेल्या प्रवाशांना मूळ गाडीच्या वेळेनंतर १२ तासांत त्याच मार्गावर धावणाऱ्या दुसऱ्या गाडीत जागा उपलब्ध करून देण्याची ‘विकल्प’ नावाची योजना सुरु केली आहे. ‘क्लोन ट्रेन’ याहून वेगळी असेल. ‘क्लोन ट्रेन’ लगोलग सुटेल व तिचे आरक्षणही आधीच मिळेल.

Web Title: Second train to be run immediately for passengers on the waiting list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.