48 तासांत पाककडून दुस-यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
By admin | Published: May 3, 2017 08:02 AM2017-05-03T08:02:26+5:302017-05-03T08:56:01+5:30
पाकिस्तानकडून बुधवारी (3 मे) सकाळी पुन्हा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - पाकिस्तानकडून बुधवारी (3 मे) सकाळी पुन्हा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील मनकोट येथे पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.
सोमवारी (1 मे) जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानकडून शहीद भारतीय जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या २००व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले तर राजेंद्रसिंग नामक जवान जखमी झाला. पाकच्या जवानांनी नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. या हल्ल्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे सोमवारी काश्मीरमध्ये होते.
J&K: Ceasefire violation by Pakistan in Mendhar"s Mankote area in early morning hours of the day, intermittent firing still continuing. pic.twitter.com/f7koznDD7F
— ANI (@ANI_news) May 3, 2017
त्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील रणनीतीची चर्चा केल्याचे समजते. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे ही अमानुषता असून, भारतीय सशस्त्र दल या अमानुष कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला. तर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत तोफगोळ्यांचा मारा करीत प्रत्युत्तर दिले. योग्यवेळी योग्य ठिकाणी या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे नॉदर्न कमांडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
देशभरात संताप
दोन जवानांचा शिरच्छेद करून विटंबना करणाऱ्या पाकिस्तानविरोधात देशभरात संताप असून, भारताने पाकला फोन करून खडसावले आहे. एका जवानाच्या मुलीने माझ्या पित्याच्या बलिदानाच्या मोबदल्यात ५० जणांचा बळी मला हवा आहे, असे म्हटले आहे. आम्ही योग्य वेळी आणि आम्ही निवडू त्या जागी उत्तर देऊ, असा इशारा भारतीय लष्कराने मंगळवारी दिला.
भारताच्या मिलिटरी आॅपरेशन्सच्या महासंचालकांनी पाकचे हे कृत्य अमानवी व भ्याड असल्याचे म्हटले आहे. शिवाय याचा जाबही विचारला आहे. या शिरच्छेद कृत्याच्या निषेधार्थ पूंछ आणि जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानविरोधात निदर्शने झाली. पाकिस्तानच्या लष्कराने रॉकेट आणि तोफांचा जोरदार मारा करून निर्माण केलेल्या संरक्षणात पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) सोमवारी नियंत्रण रेषेकडून जम्मूच्या पूंछ विभागात २५० मीटर आतमध्ये प्रवेश करून परमजीत सिंग व प्रेम सागर यांची हत्या करून शिरच्छेद केले. या राक्षसी कृत्याबद्दल भारतीय लष्कराने ‘योग्य’ ते उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
शोकमय वातावरणात २२ व्या शीख इन्फन्ट्रीचे नायब सुभेदार परमजीत सिंग (४२) यांच्या पार्थिवाला लष्करी सन्मानात त्यांचे मूळ गाव वैनपोईन (पंजाब) येथे अग्नी दिला. परमजित सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुमारे ४५ हजार लोक उपस्थित होते. परमजित सिंग यांची पत्नी परमजित कौर यांनी जेव्हा पतीचे शिरविरहीत धड बघितले त्यावेळी त्यांनी या कृत्याबद्दल पाकला जशासतसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
पाकिस्तानकडे निषेध
जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन जवानांचा शिरच्छेद केल्याबद्दल भारतीय लष्कराने मंगळवारी पाकिस्तानच्या लष्कराकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पाकिस्तानच्या समपदस्थांशी या विषयावर बोलले व त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. जेथे या दोन जवानांचा शिरच्छेद करण्यात आला त्या भागात पाकिस्तानच्या लष्कराने गोळीबार करून पूर्ण संरक्षण दिले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
महिन्यात सात घटना
पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या महिनाभरात सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. १९ एप्रिलला पूंछमध्ये १७ एप्रिलला नौशेराच्या चौक्यांवर तोफांचा मारा केला होता. याशिवाय भीमभर गली सेक्टर, बालाकोटे आणि (दिगवार) पूंछमध्येही गोळीबार केला होता.
पाक जवान, अतिरेक्यांकडून गोळीबार
पाकिस्तानने आधी रॉकेट आणि शस्त्रांनिशी हल्ला केला. बॅट आणि अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केल्यानंतर दोन शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. अतिरेकी घुसखोरी करतात त्या वेळी बॅटकडून मोठा हल्ला केला जातो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी भेट दिलेल्या स्थळापासून ३० किमी अंतरावर ही घटना घडली.
गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती...
गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी मनदीप सिंग या भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मच्छेल सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात मनदीप सिंग शहीद झाले होते.
जून २००८मध्ये गोरखा रायफल्सच्या एका जवानाला पकडण्यात आल्यानंतर त्याचे शीर कापून फेकण्यात आले होते. २०१३मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंग या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. कारगील युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृतदेह विद्रूप केला होता.
J&K: Ceasefire violation by Pakistan in Mendhar"s Mankote area in early morning hours of the day, intermittent firing still continuing. pic.twitter.com/f7koznDD7F
— ANI (@ANI_news) May 3, 2017