दुसऱ्या लाटेमुळे देशाला चुकवावी लागली मोठी किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:07 AM2021-07-02T09:07:07+5:302021-07-02T09:07:24+5:30
रिझर्व्ह बँक : माहितीची चोरी; सायबर हल्ल्यांपासून मोठा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. एप्रिल महिन्यात भारताची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. पण मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या प्रारंभापासून ती स्थिती सुधारू लागली आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटले आहे. माहितीची चोरी व सायबर हल्ल्यांचे वाढते प्रमाण यामुळेही अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, कोरोना साथीमुळे वित्तीय संस्थांना वाटले होते त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच, पण आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. बँकांकडील अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण मार्च महिन्यात ७.५ टक्के होते. सप्टेंबर २०२० मध्येही हाच आकडा होता. मात्र आता हे प्रमाण मार्च २०२२ पर्यंत ९.८० टक्के होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक अहवाल तयार केला आहे. त्यात या बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी म्हटले आहे की, कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. प्रतिबंधात्मक उपायही योजण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येईल अशी आशा पल्लवित झाली आहे. असे असले तरी आगामी काळात आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. संभाव्य लाटा कशा स्वरूपाच्या असतील, ते आताच सांगणे शक्य नाही. मात्र त्यामुळे होणारे नुकसान थोपविण्यास पावले उचलावी लागतील.