कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 'मे'च्या मध्यावर 'उद्रेक' होणार; राष्ट्रीय समितीनं यापूर्वीच केंद्राला दिला होता इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:23 AM2021-05-04T09:23:18+5:302021-05-04T09:26:43+5:30
Coronavirus Updates : मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे.
देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या तेजीनं वाढत आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा सरकारला तज्ज्ञांनी २ एप्रिल रोजीच दिला होता अशी माहिती आता समोर आली आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत कोरोनाचा पीक असेल असं केंद्र सरकारला सांगण्यात आलं होतं. परंतु यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक असेल असं सांगण्यात आलं, अशी माहिती आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आणि कोविड-१९ सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ.एम. विद्यासागर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "१३ मार्चपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांचा आलेख वर जात होता हे कोणीही पाहू शकेल. परंतु तेव्हा आमच्याकडे इतका डेटाही नव्हता की आम्ही कोणती भविष्यवाणी करू शकू," असं ते म्हणाले.
२ एप्रिल रोजी अधिकृतरित्या १५ ते २२ मे दरम्यान दररोज १.२ लाख नवे रुग्ण दररोज सापडू शकतात असं सांगण्यात आलं होतं. परंतु भारतात यापेक्षा अधिक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात दररोज ३.५ लाखांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ८ मे पर्यंत पीक वर जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतंय यामध्ये १४ ते १८ मे दरम्यान देशात अॅक्टिव्ह केसेस ३८ ते ४४ लाखांच्या दरम्यान असू शकतात असंही म्हटलं होतं. "केंद्र सरकारनं दीर्घकालिन किंवा मध्यम कालावधीच्या योजनांव्यतिरिक्त अल्पकालिन योजनांवर लक्ष केंद्रीत केलं. परंतु गेल्या काही घटनांवर लक्ष दिलं तर ही पावलं यशस्वी ठरली नसल्याचंच दिसून येतं," असं विद्यासागर म्हणाले.
केंद्राला माहिती होती का?
कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात विस्फोट होईल याची केंद्राला माहिती होती का असा प्रश्न या अभ्यासात उपस्थित करण्यात आला होता. जर असं होतं तर त्यांनी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावलं उचलली असंही विचारण्यात आलं. "सुरुवातीला १५ ते २२ मे बा कालावधी वर्तवण्यात आला होता. तसंच अशात काही उपाययोजना लागू केल्या गेल्या असत्या. परंतु यासाठी ३-४ महिन्यांचा कालावधी लागला असता. आमच्याकडे वेळ नव्हती. आम्हाला जे काही करायचं होतं ते ३-४ आठवड्यांत करायचं होतं," असं विद्यासागर म्हणाले.