दुसरी लाट लांबली, रुग्णसंख्या कमी होईना; भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:37 AM2021-07-25T06:37:03+5:302021-07-25T06:37:20+5:30
दिवसभरात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ३,४६४ इतकी राहिली. शुक्रवारी १६,३१,२६६ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या.
नवी दिल्ली : शनिवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एका दिवसात आणखी ३९,०९७ जणांना कोविड-१९ चा संसर्ग झाला असून, एकूण बाधितांची संख्या आता ३,१३,३२,१५९ झाली आहे. याशिवाय आणखी ५४६ जण मृत्युमुखी पडल्यानंतर मृतांचा आकडा आता ४,२०,०१६ झाला आहे. आराेग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,०८,९७७ असून, एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण १.३४ टक्के आहे. कोविड-१९ आजारातून बरे होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के आहे.
दिवसभरात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ३,४६४ इतकी राहिली. शुक्रवारी १६,३१,२६६ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या. एकूण चाचण्यांची संख्या आता ४५,४५,७०,८११ झाली आहे. दररोजचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २.४० टक्के आहे. सलग ३३ दिवसांपासून तो ३ टक्क्यांच्या खाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २.२२ टक्के आहे. कोविड-१९ संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३,०५,०३,१६६ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण १.३४ टक्के आहे.
‘काेव्हॅक्सिन’साठी भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द
‘काेवॅक्सिन’ ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या भारत बायाेटेकने ब्राझीलच्या दाेन कंपन्यांसाेबत केलेला करार रद्द केला आहे. ब्राझीलमधील राजकीय अस्थिरतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
ब्राझीलच्या ‘प्रिशिया मेडिकामेन्टाेस’ आणि ‘एन्हीक्शिया फार्मा’ या कंपन्यांसाेबत गेल्या वर्षी केलेला हा करार ३२४ दशलक्ष डाॅलर्स मूल्याचा हाेता. त्याअंतर्गत २ काेटी डाेस ब्राझीलमध्ये निर्यात करण्यात येणार हाेते. तसेच ब्राझीलमध्ये लसीला मंजुरी मिळविण्यासाठीही या कंपन्यांचे सहकार्य राहणार हाेते. मात्र ब्राझीलमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले हाेते.