CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:48 AM2021-06-02T05:48:28+5:302021-06-02T05:50:11+5:30

९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले

Second wave rendered 1 crore Indians jobless 97 per cent households incomes declined in pandemic says CMIE | CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

Next

मुंबई : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सुमारे १ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी दिली.

व्यास यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मेअखेरीस बेरोजगारीचा दर १२ टक्के होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये तो ८ टक्के होता. याचाच अर्थ असा की, देशातील तब्ब्ल एक कोटी भारतीयांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. रोजगार गमावण्यामागे कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हे मुख्य कारण आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाल्यानंतर या समस्या अंशत: कमी होतील. मात्र पूर्णत: संपणार नाहीत. 

व्यास यांनी सांगितले की, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे, त्यांना नवा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात. मात्र, अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुन्हा तयार होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागतो. ‘सीएमआयई’ने देशातील १.७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी केवळ ३ टक्के उत्तरदात्यांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे नमूद केले. ५५ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले. ४२ टक्के लोकांनी उत्पन्न आदल्या वर्षीएवढे स्थिर राहिल्याचे सांगितले. यात वाढलेली महागाई समायोजित केल्यास ९७ टक्के कुटुंबाच्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून येईल.

बेरोजगारीचा चार टक्के दर मानला जातो सामान्य 
मे २०२० मध्ये बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर गेला होता. कारण गेल्या वर्षी राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेक जाणकारांच्या मते कोविड-१९ची दुसरी लाट आता शिखरावर असून, यापुढे तिची घसरण सुरू होईल. त्याबरोबर राज्ये अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात करतील. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ३ ते ४ टक्के बेरोजगारीचा दर सामान्य आहे.

Web Title: Second wave rendered 1 crore Indians jobless 97 per cent households incomes declined in pandemic says CMIE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.