दुसऱ्या लाटेत लसीने हजारो लोकांना वाचवले; रुग्णालयात दाखल व्हायची वेळ ८० % कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:04 AM2021-06-19T06:04:19+5:302021-06-19T06:04:42+5:30
नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे.
- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणामुळे देशात हजारो लोकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, असे कोरोना लढाईत सरकारचे सल्लागार आणि निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले. लस घेतलेले आरोग्य कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ७५ ते ८० टक्के कमी होते, असे ते म्हणाले.
कोरोना रुग्ण आणि अति दक्षता विभागासारख्या जोखमीच्या वातावरणात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेच्या हवाल्याने पॉल म्हणाले की, लस घेतल्यानंतरही संक्रमित होणाऱ्यांमध्ये फक्त आठ टक्क्यांनाच ऑक्सिजनची गरज पडली, तर अतिदक्षता विभागात फक्त सहा टक्क्यांनाच जायची वेळ आली. पॉल म्हणाले की, आकडेवारी हे सांगते की, लसीमुळे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत, म्हणून लस घेणे खूप गरजेचे आहे.
नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे. ५३१ जिल्ह्यांत संक्रमणाचा दर खाली येत आहे म्हणून निष्काळजी होऊन चालणार नाही, असे पॉल म्हणाले.