शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात पुन्हा हिंसाचार?; गुप्तचर यंत्रणांनी मिळाली धक्कादायक माहिती
By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 11:30 AM2021-02-03T11:30:55+5:302021-02-03T11:32:34+5:30
२६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतील.
नवी दिल्ली – २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुप्तचर यंत्रणांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रे लपवण्यात आलेली आहेत. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिंधु बॉर्डर आणि टीकरी बॉर्डर अतिसंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे.
२६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतील. लाल किल्ल्यासारख्या घटनेप्रमाणे धारदार शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरविण्याचा त्यांचा हेतू असेल. हरियाणाला लागून असलेल्या सीमा भागात धोका अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. याठिकाणी आधीच मोठ्या-धारदार शस्त्रे येथे लपविली आहेत. पंजाब, हरियाणामधील गुंडांसह देशविरोधी शक्ती या आंदोलनात उतरल्या आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कतेनंतर दिल्ली पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळपासून उच्च पोलीस अधिकारी दिल्लीच्या त्या सर्व सीमांना भेट देताना आणि सर्व प्रकारच्या बंदोबस्ताचा आढावा घेताना दिसले. दिल्ली पोलिसांच्या स्थानिक तज्ञांची टीमही शेतकऱ्यांमधील होणाऱ्या संशयास्पद घटनांकडे लक्ष ठेवून आहे. तसेच, पंजाब हरियाणाच्या मोस्ट वॉन्टेड गुंडांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर नजर ठेवून आहे.
सोमवारपासून अनेक प्रकारचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पोलिसांच्या तयारीबाबतही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, २६ जानेवारी रोजी निश्चित केलेला मार्ग तोडू न ज्याप्रकारे लाल किल्ल्यावरील हिंसाचारातून ४०० पोलीस जखमी झाले, ते पाहता पोलिसांनी ६ फेब्रुवारीला होणाऱ्या चक्का जाम आंदोलनासाठी पूर्णपणे सुरक्षेची व्यवस्था करत आहेत. दिल्लीत शस्त्रास्त्रे घेऊन शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये मोठ्या संख्येने काही शक्ती दाखल झाल्या. अनेकांच्या हातात तलवारी, फरस, भाले, लाठीचे खांब, लोखंडी पाईप आणि इतर धोकादायक शस्त्रे होती. यासंदर्भात १००० हून अधिक फोटो व्हिडिओ पोलिसांकडे आहेत.