सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:33 AM2020-01-12T03:33:49+5:302020-01-12T03:34:39+5:30
अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील नॅशनल कॉन्फरन्सचे चेअरमन फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यासाठी सरकारने एका गोपनीय योजनेवर काम सुरू केल्याचे वृत्त आहे. काही काळ सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर त्यांची सुटका केली जाऊ शकते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जात असून अब्दुल्ला पिता-पुत्राशी संपर्क केला जाऊ शकतो. अब्दुल्ला पिता-पुत्रांनी काही काळ भारत सोडून लंडनमध्ये राहायला जावे, असा एक पर्याय त्यात आहे. लंडनमधून आपल्या एजंटांमार्फत ते जम्मू-काश्मिरातील आपला पक्ष चालवू शकतील. गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर सरकारने अब्दुल्ला पिता-पुत्रांस स्थानबद्ध केले होते. तेव्हापासून ते स्थानबद्धतेतच आहेत. काश्मिरातील २६ लोकांची जम्मू-काश्मीर सरकारने स्थानबद्धतेतून शुक्रवारी सुटका केली. निशत येथील ज्येष्ठ वकील नजीर अहमद रोंगा यांचा त्यात समावेश आहे. काश्मीर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले रोंगा हे फुटीरवादी हुरियत नेते मिरवैज उमर फारुक यांचे निकटचे सहकारी आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सकडून इन्कार
अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे. राजकीय नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणीही पक्षाने केली आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे वृत्त निराधार आहे. असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच असा प्रस्ताव आमच्या नेत्यांकडून स्वीकारला जाऊ शकतही नाही. आमच्या नेत्यांनी विजनवासात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.