भारत-पाक यांच्यात दुबईत गुप्त चर्चा; ‘राॅ’,‘आयएसआय’ अधिकाऱ्याचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:14 AM2021-04-16T01:14:05+5:302021-04-16T07:17:48+5:30
India and Pakistan : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली.
नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावर्षी जानेवारीत दुबईमध्ये ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली. संयुक्त अरब अमिरातीने या भेटीसाठी पुढाकार घेतला हाेता.
यासंबंधी दाेन्ही सस्थांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, पाकिस्तानातील सुरक्षाविषयक तज्ज्ञ आयेशा सिद्दीक यांच्यानुसार अशा प्रकारच्या बैठका यापूर्वीही गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या आहेत. या बैठका थायलंड, दुबई, तसेच लंडनमध्ये झाल्याची माहिती आयेशा यांनी दिली.
वाढलेला तणाव
काश्मीरात २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कठाेर भूमिका घेतली हाेती. भारताने त्यानंतर एअर स्ट्राइक करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे माेठे तळ उद्ध्वस्त केले हाेते. तेव्हापासून दाेन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे, तर यावर्षी काश्मीरमध्ये माेठ्या प्रमाणात घुसखाेरीही झाली असून, अनेक दहशतवाद्यांचा खात्माही करण्यात आला आहे.
संवाद महत्त्वाचा
- चर्चा न करण्यापेक्षा दाेन्ही देशांमध्ये संवाद सुरू हाेणे जास्त चांगले आहे, असे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या बैठकांबाबत जास्त वाच्यता न करता चर्चा सुरू ठेवणे अधिक याेग्य असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
- सध्या केवळ प्राथमिक स्वरूपाचीच चर्चा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या चर्चेतून दाेन्ही देशांमध्ये सध्याची तणावाची परिस्थिती काही प्रमाणात कमी हाेईल. त्याशिवाय फार काही साध्य हाेणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.