स्वच्छ भारत अभियानाच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांचा राजीनामा
By Admin | Published: September 3, 2015 10:22 AM2015-09-03T10:22:51+5:302015-09-03T10:23:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांनीदेखील स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - एल सी गोयल यांनी गृहसचिव पदावरुन तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांनीदेखील स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. जोशी यांनीदेखील वैयक्तिक कारणांमुळे निवृत्ती स्वीकारत असल्याचे म्हटले असले तरी लागोपाठ दोन केंद्रीय सचिवांनी राजीनामा दिल्याने मोदी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
१९८० च्या गुजरात बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या विजयालक्ष्मी जोशी या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिव होत्या. त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशनचा कार्यभारही सोपवण्यात आला होता. जोशी यांच्या निवृत्तीसाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक होता. मात्र त्यांनी गुरुवारी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. केंद्र सरकारनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासंदर्भात जोशी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मोदींनी थाटामाटात स्वच्छ भारत अभियान सुरु केले असले तरी अद्याप हे अभियान यशस्वी झालेले नाही. यामुळे जोशी यांनी राजीनामा दिला असावा असे तर्कवितर्कही लावले जात आहेत. जोशी यांचे पती व माजी आयएएस अधिकारी जी पी जोशी यांनीदेखील २००८ मध्ये स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती.