सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 08:34 PM2019-12-26T20:34:10+5:302019-12-26T20:34:36+5:30
रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे अशी गोष्ट
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून 2018-19 हे वर्ष रेल्वेसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरले आहे. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभरात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. तसेच रेल्वे अपघातांमध्येही लक्षणीय घट झालेली आहे.
या संदर्भातीली आकडेवारी रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकेकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन, क्राँसिंगमधील गोंधळ, आग लागणे, गाडी रुळावरून घसरणे अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र आता अशा अपघातांमध्ये 95 टक्क्यांनी घट झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये भारतीय रेल्वेच्या कार्यकक्षेत 73 अपघात झाले होते. मात्र यावर्षी या अपघातात अजून घट होऊन तो आकडा 59 वर आला आहे.
सुरुवातीच्या वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण लक्षणीय होते. तसेच त्यावेळी रेल्वे अपघातांमध्ये जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. 1990 ते 1995 या पाच वर्षांच्या काळात सुमारे 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2013 ते 2018 या काळात सुमारे 990 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, रेल्वेने अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी यात गृहित धरलेली नाही. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.