पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरीच्या तयारीत, गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 01:32 PM2019-08-29T13:32:35+5:302019-08-29T13:37:49+5:30
गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
अहमदाबाद/कांडला - श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादीभारतात घुसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर आता गुजरातच्या कांडलामध्ये कच्छ मार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी कमांडो समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळताच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. समुद्र मार्गे भारतात येऊन दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातच्या कांडलामध्ये कच्छ मार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी भारतातमध्ये घुसखोरी करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
Security enhanced at the Kandla port in view of inputs that 'Pakistani commando are likely to infiltrate into Indian territory through Kutchh area, through sea route to create communal disturbance or terrorist attack in Gujarat.' pic.twitter.com/viGS1MqDrZ
— ANI (@ANI) August 29, 2019
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याआधी श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतामध्ये याआधी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. तसेच गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत.