सुरक्षेतही घोटाळा
By Admin | Published: July 5, 2016 12:03 AM2016-07-05T00:03:51+5:302016-07-05T00:10:45+5:30
औरंगाबाद : महापालिकेत कधी कोणता घोटाळा उघडकीस येईल याचा नेम नाही. येथील मंडळी कधी गाळ खातात, तर कधी मुक्या जनावरांसाठी औषध खरेदीच्या नावावर लाखो रुपये हडप करतात
औरंगाबाद : महापालिकेत कधी कोणता घोटाळा उघडकीस येईल याचा नेम नाही. येथील मंडळी कधी गाळ खातात, तर कधी मुक्या जनावरांसाठी औषध खरेदीच्या नावावर लाखो रुपये हडप करतात. आता सुरक्षारक्षक न नेमता तब्बल ३१ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. सुरक्षारक्षक घोटाळ्याचे बिंग फुटताच एका कंत्राटी कर्मचाऱ्याने महापालिकेच्या इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
सिडको नाट्यगृह येथे दोन सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी मागील काही दिवसांपासून मनपा पदाधिकाऱ्यांकडून सुरू होती. मात्र, याकडे मनपाच्या कामगार विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. सोमवारी दुपारी काही नगरसेवक मनपाच्या कामगार विभागात जाब विचारण्यासाठी गेले. तेथील कंत्राटी कर्मचारी नितीन सांगळे याने नगरसेवकांवरच जोरदार आरोप सुरू केले. सुरक्षारक्षक नेमण्यासाठी तुम्ही पैसे कशाचे मागता म्हणून जोरजोरात आरडाओरड सुरू केली.
हा आवाज ऐकून मनपाचे सुरक्षारक्षक जाधव, शेफ कामगार कार्यालयात पोहोचले. त्यांना पाहून सांगळे आणखी बिथरला. त्याने चक्क तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचे नाटक सुरू केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून खाली आणले.
दरम्यान, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार हे अतिरिक्त आयुक्तांसोबत दुसऱ्या मजल्यावरून जात होते.
नितीन सांगळे याने मनपा पदाधिकाऱ्यांना पाहून अगोदर चक्कर आल्याचे नाटक केले. क्षणार्धात त्याने पदाधिकाऱ्यांवरच आरोप सुरूकेले. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे छत्र आमच्या डोक्यावरून गेल्याने कोणीही आमच्यावर आरोप करीत आहे. तुमची पण पूर्वी एवढी हिंमत झाली नसती. त्याचे हे बेताल आरोप ऐकून पदाधिकाऱ्यांचीही क्षणभर सटकली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे आदेश देण्यात आले. (पान २ वर)
सिद्धार्थ उद्यान, सिल्लेखाना, संत एकनाथ रंगमंदिर आदी अनेक ठिकाणी ४५ ते ५० सुरक्षारक्षक नेमल्याचे बोगस हजेरीपत्रक तयार करण्यात येते. हे कर्मचारी संबंधित ठिकाणी ३० दिवस कामावर हजर होते म्हणून आम्हाला हजेरीपत्रकावर सह्या करा म्हणून दबाव टाकण्यात येते.
४महापालिकेतील काही अधिकारीच आम्हाला सह्या करा म्हणून दबाव टाकतात असा आरोप सुरक्षारक्षकांच्या प्रमुखांनी केला. ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बोगस सुरक्षारक्षक नेमून लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याची फाईल त्वरित मागवा, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. एक तास झाला तरी ही फाईल मनपा प्रशासनाला सापडत नव्हती. शेवटी महापौरांनी कंत्राटी कर्मचारी नितीन सांगळे याच्यावर कारवाई करा, पोलिसांत तक्रार द्या असे आदेश प्रशासनाला दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना देण्यात आले.