संवेदनशील स्थळांचे सुरक्षा आॅडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 02:25 AM2016-01-16T02:25:33+5:302016-01-16T02:25:33+5:30

सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांची सर्व संवेदनशील ठिकाणे तसेच पोलीस स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कालबद्ध आॅडिट करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी करण्यात आली.

Security audit of sensitive sites will be done | संवेदनशील स्थळांचे सुरक्षा आॅडिट होणार

संवेदनशील स्थळांचे सुरक्षा आॅडिट होणार

Next

नवी दिल्ली : सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांची सर्व संवेदनशील ठिकाणे तसेच पोलीस स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे कालबद्ध आॅडिट करण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी करण्यात आली.
पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि सुरक्षेच्या विविध पैलूंवर चर्चा केली. गेल्या २ जानेवारीच्या पठाणकोट हल्ल्यापासून दिल्लीसह अनेक राज्यात हायअलर्ट जारी आहे. सुरक्षा व गुप्तचर संस्थांना अधिक बळकट करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
सीमेपलीकडून असलेला धोका थोपविण्याकरिता गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम आणि अत्याधुनिक बनविणे आवश्यक आहे,असे गृहमंत्रालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नॉर्थ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीत पठाणकोट हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्वंकष चर्चा आणि अशी परिस्थिती हाताळण्यातील सुरक्षा संस्थांच्या भूमिकेवर ऊहापोह करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Security audit of sensitive sites will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.