काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 04:38 AM2021-01-31T04:38:10+5:302021-01-31T07:07:59+5:30
Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
श्रीनगर : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लेलहार गावामध्ये दहशतवादी असल्याची खबर मिळताच, लष्कर व पोलिसांनी शुक्रवारी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये एक दहशतवादी जखमी झाला.
चकमकीनंतर काही वेळाने दोन्ही दहशतवादी सुरक्षा जवानांना शरण आले. त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफली व दारूगोळा जप्त केला आहे. जखमी झालेल्या दहशतवाद्याला प्रथम पुलवामा येथे रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्याला श्रीनगर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
काश्मीरमधील त्राल भागामध्ये मांडुरा परिसरात गुरुवारी रात्री सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. तेही हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी असल्याचे काश्मीर पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानकडून सीमेनजीक गोळीबार
पाकिस्तानी सैन्याने काश्मिरात कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेनजीक गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा गोळीबार सुरू झाला. बीएसएफने याला चोख प्रत्युत्तर दिले. रात्री तीन वाजेपर्यंत दोन्हीकडून गोळीबार सुरू
होता.