भारतीय सैन्याकडून लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मूत पुन्हा दिसले संशयित ड्रोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 10:24 AM2021-07-16T10:24:21+5:302021-07-16T10:25:17+5:30
Security Forces Killed Terrorists: चकमकीत सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झालेत.
श्रीनगर: श्रीनगरमधील दानमार परिसरात शुक्रवारी भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दोघांचे मृतदेह सैन्याने ताब्यात घेतले आहेत. मृतांमध्ये इरफन आणि बिलाल अहमद असून, हे दोघे पाकिस्तानातील लश्कर-ए-तैएबासाठी काम करायचे. सैन्याने त्या दोघांकडून AK 47 रायफल आणि 4 हँड ग्रेनेड जप्त केले आहेत.
चकमकीत सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झालेत. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सफाकदल-सौरा रोड जवळ असलेल्या दानमार परिसरात दहशतवादी लपले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. यानंतर सैन्याने नाकाबंदी करुन सर्च ऑपरेशन सूरू केले. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सैन्यावर फायरिंग सुरू केली. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याला फायरिंग करावी लागली. यात दोन दहशतवादी मारले गेले.
बुधवारी तीन दहशतवादी मारले
यापूर्वी बुधवारी पुलवामामध्ये भारतीय सैन्याने चकमकीत तीन दहशतवाद्यांना मारले. यात पाकिस्तानी लश्कर कमांडर एजाज उर्फ अबु हुरैरादेखील होता. इतर दोघे स्थानिक होते. IGP विजय कुमार यांनी सांगितले की, हुरैरा श्रीनगर आणि पुलवामामध्ये सक्रीय होता. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये मागील 15 दिवसात 18 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
जम्मूमध्ये पुन्हा दिसले संशयित ड्रोन
बुधवारी रात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनजवळ एक संशयित ड्रोन दिसून आला. जम्मू-काश्मीरमध्ये संशयित फ्लाइंट ऑब्जेक्ट दिसण्याची ही मागील दोन दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी, मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर एक उडणारी वस्तु दिसली होती.
जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता
26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. 5 मिनीटांच्या अंतराने दोन ब्लास्ट झाले. यावळी ड्रोनद्वारे एअरफोर्स स्टेशनवर दोन IED टाकण्यात आले. जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांनी त्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले होते.