छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 14 जवान जखमी, 13 बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 05:32 AM2020-03-22T05:32:01+5:302020-03-22T05:36:33+5:30
या चकमकीत पाच ते सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे समजते.
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचे 14 जवान जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, या चकमकीत पाच ते सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जखमी जवानांना एअरलिफ्टने रायपूर येथील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी सांगितले की, "या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच, इतकेच नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे. या चकमकीत 14 जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, 13 जवान अद्याप बेपत्ता आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवान जंगलातून परत आल्यानंतर अधिक माहिती मिळेल."
कासलपाड परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि एसटीएफच्या टीमला शुक्रवारी दोरनापालहून रवाना करण्यात आले होते. ही टीम बुरकापाल येथे पोहोचली आणि येथून कोब्रा जवानांची एक तुकडी त्यांच्यासोबत नक्षली कारवाईसाठी रवाना झाली.मात्र, असे सांगण्यात येत आहे की, सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांना सरप्राइज एनकाउंटरमध्ये अडकवण्याच्या तयारीत होते. परंतु जवान जंगलात आल्याची माहिती आधीच नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली होती.
नक्षलवाद्यांनी रणनीतीचा एक भाग म्हणून जवानांना जंगलात प्रवेश करण्यास दिला. त्यानंतर जवान कासलपाडच्या पुढे गेले असता त्यांना नक्षलवाद्यांची कोणतीच हालचाल दिसली नाही, त्यानंतर परत येत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळी नक्षलवाद्यांनी कासलपाडच्या काही अंतरावर कोराज डोंगरीजवळ डोंगरावरून जवानांवर हल्ला केला. अचानक झालेल्या गोळीबारात काही जवान जखमी झाले. यानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.