सोनिया गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात कमांडो तीन दिवसांपासून बेपत्ता, प्रकरण गंभीर असल्याची सुरक्षा यंत्रणांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 01:02 PM2017-09-06T13:02:45+5:302017-09-06T13:04:43+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थान 10 जनपथवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला एसपीजी कमांडो बेपत्ता झाला आहे. 3 सप्टेंबरपासून कमांडो बेपत्ता आहे.
नवी दिल्ली, दि. 6 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थान 10 जनपथवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला एसपीजी कमांडो बेपत्ता झाला आहे. 3 सप्टेंबरपासून कमांडो बेपत्ता आहे. तुघलक रोड पोलीस शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी कमांडो गणवेश घालून 10 जनपथवर पोहोचला होता, त्यादिवशी त्याची ड्यूटीच लावण्यात आली नव्हती. ड्यूटी नसतानाही कमांडो गणवेश घालून घराबाहेर का पडला ? आणि मग जर त्याने गणवेश घातला होता, तर 10 जनपथला का आला ? हे प्रश्न पोलिसांना सतावत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गंभीर असू शकतं. एसपीजी कमांडो काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधीच्या घरी सुरक्षेसाठी तैनात होता त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची सूचना दिली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अचानक गायब झालेल्या या कमांडोचं नाव राकेश कुमार असं आहे. आपल्या कुटुंबासोबत द्वारका सेक्टर-8 मध्ये एका भाड्याच्या घरात तो राहत होता. त्याच्यासोबत पत्नी, मुलगा, मुलगी आणि कुटुंबातील अन्य सदस्य राहत होते. राकेशच्या वडिलांनीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. राकेशमधील क्षमता पाहता त्याची एसपीजीसाठी निवड करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश द्वारकामधील आपल्या घरातून 1 सप्टेंबरच्या सकाळी एसपीजी कमांडोचा गणवेश घालून निघाला होता. तो 10 जनपथलाही पोहोचला होता. तेथे आपल्या सहका-यांची भेट घेतल्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास तिथून तो निघाला. आपण कुठे जात आहोत याबद्दल त्याने कोणालाच काही सांगितलं नाही. 10 जनपथमधून जात असताना त्याने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर सोबत नेली नव्हती. त्याने आपला मोबाइलही तेथेच सोडला होता. त्यामुळे पोलिसांना मोबाइल फोनच्या सहाय्याने राकेशला ट्रॅक करणं कठीण जात आहे.
नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, '2 सप्टेंबरला राकेश घरी आला नाही तेव्हा त्याला डबल ड्यूटी लागली असेल किंवा मित्राकडे गेला असेल असं कुटुंबियांना वाटलं. राकेशला फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. त्यावेळी सिग्नल नसलेल्या ठिकाणी ड्यूटी लागली असेल असं कुटुंबियांना वाटलं. पण 3 सप्टेंबरलाही तो घरी आला नाही तेव्हा मात्र चिंता वाढली'. कुटुंबियांनी 10 जनपथवर जाऊन चौकशी केली असता, तो 1 सप्टेंबरपासून कामावर आलाच नसल्याचं त्यांना कळलं.