'सैन्यदलातील कपात म्हणजे सुरक्षेशी तडजोड'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:47 AM2018-09-14T02:47:31+5:302018-09-14T06:36:04+5:30
राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.
नवी दिल्ली : ‘भारतीय सैन्यदल जगातल्या ५ मोठ्या सैन्यदलांपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर देशाविषयी समर्पणाची भावना अन् संरक्षण सिद्धतेबाबत विशेष कौशल्याचे व कार्यक्षमतेचे दर्शन या सैन्यदलाने साऱ्या जगाला वेळोवेळी घडवले आहे, अशा सैन्यदलाबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व व अभिमान आहे. आता खर्च कमी करण्यासाठी सैन्यदलात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा केंद्र सरकारचा जो प्रस्ताव चर्चेत आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे, अशा आशयाचे तीन ट्वीट भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.
प्रसारमाध्यमातील ज्या वृत्तांशी संबंधित हे ट्वीट शत्रुघ्न सिन्हांनी केले, त्या बातम्यांमध्ये ५ ते ७ हजार कोटींच्या संरक्षण खरेदीसाठी सैन्यदलात सुमारे दीड लाख जवानांची मोठी कपात करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे नमूद केले होते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा अफाट खर्च कमी करण्याबाबत असा तर्क मांडला गेला की, भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी सध्या १.२ लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातला ८३ टक्के खर्च केवळ संरक्षण व्यवस्थेचा महसुली खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) व सैन्यदलाचे वेतन यासाठी खर्च होतो. सैन्यदलाला मिळणाºया बजेटपैकी फक्त १७ टक्के म्हणजे २६ हजार ८२८ कोटी संरक्षण सिद्धतेसाठी लागणाºया साधनसामग्रीवर खर्च होतो. या बजेटवर सैन्यदल अगोदरच नाराज आहे. आगामी काळात सैन्यदलात व्यापक कपात करून जे ३१ हजार ८२६ ते ३३ हजार ८२६ कोटी हाती येतील त्यातून ५ ते ७ हजार कोटींच्या शस्त्रास्त्रांची खरेदी भारताच्या संरक्षणासाठी करण्याचा सरकारचा इरादा आहे. याच वृत्तावर सिन्हा भडकले व राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह शहादरा येथे सफाई मजुरांना विशेष संदेश देण्यासाठी आयोजित सरकारी कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा गेले तेव्हा भाजप कार्यर्क्त्यांनी काळे झेंडे दाखवून सिन्हांचा जोरदार निषेध केला. वाजपेयी मंत्रिमंडळात शत्रुघ्न सिन्हा मंत्री असताना शहादराचे विद्यमान जिल्हाधिकारी त्यांचे वैयक्तिक सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळीत होते.
मी बोलतो ती ‘दिल की बात’
भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या निषेध घोषणांच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मन की बात’ करण्याचे पेटंट काही माझ्यापाशी नाही. मी जे काही बोलतो ती दिल की बात असते. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे जनता निराश आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत, सैन्यदलात कपात करण्याचा प्रस्ताव तर धक्कादायक आहे. अशा वेळी इतरांना सल्ले देण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या मंत्रिमंडळावर होणाºया खर्चात कपात का करीत नाही.’