मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:51 AM2019-10-31T02:51:07+5:302019-10-31T02:51:28+5:30
चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली -काँग्रेसचा आरोप
श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर ८७व्या दिवशी, बुधवारीही काश्मीरमधील बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकसेवा बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
दहशतवाद्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा दलांची फ्लाइंग स्क्वाड तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अधिकदक्षता बाळगण्यात येत आहे. बिगरकाश्मिरींवर हल्ल्यांचे दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा जवान सज्ज झाले आहेत. काश्मीरमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत काही जण जखमी झाले आहेत.
बाजारपेठा बंद असल्याने फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र गेले दोन दिवस फेरीवाल्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र १० वी व १२वीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या. काश्मीरमध्ये लँडलाइन व पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू झाली असली तरी इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पाच मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी जखमी झालेल्या एका मजूरावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा मजूर मरण पावल्याचे चुकीचे वक्तव्य पोलिसांनी आधी केले होते.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवा : काँग्रेस
नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील स्थिती आणखी बिघडली आहे, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर चौधरी यांनी बुधवारी केली आहे. काश्मीरमध्ये नेमकी स्थिती काय आहे हे सरकार जनतेपासून दडवू पाहत आहे.
पाच लाख भरपाई
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या पाच मजूरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या हल्ल्यामागचे खरे सत्य काय आहे याचा कसून शोध घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मजुरांच्या हत्येचा ममता बॅनर्जी व राज्यपाल धनखर यांनी निषेध केला आहे.