सुरक्षा वाहने त्रासदायक - राहुल गांधी यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:03 AM2017-08-10T01:03:07+5:302017-08-10T01:03:21+5:30

विशेष सुरक्षा गटाच्या बंदिस्त वाहनांमध्ये अजिबात खेळती हवा येत नाही आणि आत गुदमरायला होते. ती वाहने आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहेत. एवढेच नाही तर त्या वाहनांतील आसनेही पुरेशी आरामदायी नाहीत, अशी लेखी तक्रार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयाने गेल्या वर्षीच एसपीजीकडे केली होती.

Security vehicles troublesome - Rahul Gandhi's complaint | सुरक्षा वाहने त्रासदायक - राहुल गांधी यांची तक्रार

सुरक्षा वाहने त्रासदायक - राहुल गांधी यांची तक्रार

Next

 नवी दिल्ली : विशेष सुरक्षा गटाच्या बंदिस्त वाहनांमध्ये अजिबात खेळती हवा येत नाही आणि आत गुदमरायला होते. ती वाहने आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहेत. एवढेच नाही तर त्या वाहनांतील आसनेही पुरेशी आरामदायी नाहीत, अशी लेखी तक्रार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयाने गेल्या वर्षीच एसपीजीकडे केली होती.
अलीकडेच गुजरातमधील पूरग्रस्त भागाच्या भेटीवर असताना राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हा हल्ला भाजपाचे कटकारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर दुसरीकडे भाजपाचे असे म्हणणे आहे की, विशेष सुरक्षा गटाची सुरक्षा असताना राहुल गांधी यांनी खासगी वाहनाचा वापर का केला? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत केला होता. यानिमित्ताने २०१६मध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयाने या एसपीजीच्या वाहनांबाबत तक्रार केली होती, असे समोर आले आहे.
एसपीजीच्या अतिबंदिस्त वाहनांच्या खिडक्या पूर्णत: उघडत नाहीत. त्यामुळे कारमधून कार्यकर्त्यांशी नीट संवाद येत नाही, त्यांना भेटता येत नाही, असेही राहुल यांच्या कार्यालयाने तक्रारीत स्पष्ट नमूद केले होते. एसपीजीचे तत्कालीन प्रमुख विवेक श्रीवास्तव यांंच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. एवढेच नाहीतर त्यांनी एसपीजीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडेही वारंवार एसपीजीच्या या वाहनांच्या ताफ्याच्या सुमार दर्जाकडे लक्ष वेधले होते. खेळत्या हवेचा अभाव आणि आरामदायी आसने नसणे, यामुळे वाहनांतून सलग अनेक तास प्रवास करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात तर गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे एसपीजीच्या वाहनांतील या त्रुटी दूर कराव्यात, यासाठी एसपीजी अधिकाºयांशी चर्चा करण्याची तयारीही राहुल गांधी यांनी दर्शवली होती. तथापि, या तक्रारीची दखल घेऊन एसपीजीने अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत.
राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या वतीने एसपीजीला देण्यात आलेल्या पत्रावर राहुल गांधी सहायक कौशल किशोर विद्यार्थी यांची स्वाक्षरी आहे. एसपीजीचे अधिकारी पक्ष कार्यकर्त्यांशी अत्यंत कठोरपणे वागतात, अशी तक्रारही या पत्रात करण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाने फेटाळले आक्षेप...

केंद्रीय गृहमंत्रालयाने मात्र राहुल गांधी यांचे एसपीजीच्या वाहनांबाबतचे आक्षेप फेटाळून लावले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती हीच वाहने वापरतात. कोणीही या वाहनांबाबत तक्रार केलेली नाही, असा दावाही केंद्रीय गृहमंत्रालयाने केला आहे.

Web Title: Security vehicles troublesome - Rahul Gandhi's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.