उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:09 AM2019-03-28T05:09:16+5:302019-03-28T05:09:46+5:30

पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने अद्वितीय उपलब्धी मानली जात आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून ३०० कि.मी. अंतरावरील कक्षेत भ्रमण करणारा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केला गेला.

Security will be achieved through satellite missile test: PM Modi | उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी

उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी

Next

नवी दिल्ली : पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने अद्वितीय उपलब्धी मानली जात आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून ३०० कि.मी. अंतरावरील कक्षेत भ्रमण करणारा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केला गेला.
भारताने ही चाचणी कोणताही देश डोळ्यापुढे ठेवून केलेली नाही, तसेच हे करताना भारताने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान म्हणाले की, वेगवान प्रगती करणाऱ्या भारताने स्वसंरक्षणास अधिक बळकटी देण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. बाह्य अंतराळाचा शस्त्रस्पर्धेसाठी वापर करण्यास भारताने नेहमीच विरोध केला आहे. या चाचणीने भारताच्या या भूमिकेत बदल झालेला नाही. भारतीयांची सुरक्षा व कल्याणासाठी भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. आमचे सामरिक उद्दिष्ट युद्धाचे वातावरण तयार करण्याचे नव्हे, तर शांततेची सुनिश्चिती करणे हे आहे. जगाच्या या भागाच्या सुरक्षेसाठी भारत बलशाली असणे गरजेचे आहे.
कृषी, संरक्षण, दळणवळण, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक, हवामानाचा अभ्यास, दिशा निर्देशन, शिक्षण, वैद्यकीय सेवा या व इतरही अनेक कामांसाठी आज आपण अंतराळाचा व उपग्रहांचा वापर करीत आहोत. अशा परिस्थितीत भारताच्या अंतराळात कार्यरत असलेल्या उपग्रहांच्या सुरक्षिततेची सिद्धता करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोदी म्हणाले की, हे सर्व काम पूर्णपणे देशी तंत्रज्ञानाने करण्यात आले. याने अंतराळ कार्यक्रमात भारत आणखी ताठ मानेने उभा राहिला आहे. यामुळे भारत अधिक बलशाली व अधिक सुरक्षित होईल आणि याने शांतता व सलोख्याला बळकटी मिळेल.

जगाला केले आश्वस्त
या चाचणीबाबत जगाला आश्वस्त करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानेही निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, बाह्य अंतराळात असलेल्या भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. ही सुरक्षितता साध्य करण्यात आम्ही किती सक्षम आहोत, याची खातरमजा करण्यासाठी भारताने ही चाचणी केली. खात्रीने यश मिळेल याचा आत्मविश्वास आल्यावर आम्ही चाचणी केली. यावरून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याचा भारत सरकारचा हेतू स्पष्ट होतो.

मोहीम यशस्वी करण्यात सहभागी झालेल्यांचे अभिनंदन
ही मोहीम यशस्वी करण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करून मोदी म्हणाले की, ‘मिशन शक्ती खूप गुंतागुंतीचे होते. अत्यंत वेगवान पद्धतीचे हे मिशन लक्षणीय अचूकतेने अवघ्या तीन मिनिटांत फत्ते केले गेले. यावरून आपल्या थोर वैज्ञानिकांचे कमालीचे चातुर्य व आपल्या अवकाश कार्यक्रमाचे यश अधोरेखित होते.

Web Title: Security will be achieved through satellite missile test: PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.