चार वर्षे गंजत पडलेल्या सेडान कारचा होणार वापर; अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:34 AM2020-12-01T04:34:03+5:302020-12-01T04:34:17+5:30
लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनी ही कार विकत घेतली होती. या कारचा वापर व्हीव्हीआयपी पाहुणे व इतरांसाठी केला जाणार आहे
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : चार वर्षांपासून वापरात नसल्यामुळे संसदेच्या गॅरेजमध्ये गंजत पडलेली ४८ लाख रुपये किमतीची जॅग्वार सेडान कारचा काही प्रमाणात वापर करण्याचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी ठरवले आहे.
लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनी ही कार विकत घेतली होती. या कारचा वापर व्हीव्हीआयपी पाहुणे व इतरांसाठी केला जाणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार बेमुदत काळासाठी गॅरेजमध्ये राहिल्यास तिला हमीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितल्यावर बिर्ला यांनी हा निर्णय घेतला. लोकसभेचे सभापती बिर्ला यांची या कारचा वापर वैयक्तिक उपयोगासाठी करण्याची इच्छा नव्हतीच. कारण अग्रहक्काचा विचार केला तर लोकसभेचे सभापती हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान आणि राज्यपालांच्या नंतर सहाव्या स्थानी आहेत.
२०१६ मध्ये घेतली...
सुमित्रा महाजन यांनी २०१६ मध्ये ही लक्झरी कार विकत घेतली व मे २०१९ पर्यंत वापरली नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर त्यांचे म्हणणे होते कार गैरसोयीची आहे. वादानंतर त्यांनी कार न वापरण्याचे ठरवले. २००१ पासून लोकसभेच्या अनेक सभापतींनी ॲम्बेसेडरपासून ते होंडा ॲकॉर्ड कार्स वापरल्या.